पुणे: शहराच्या पातळीवर मोठे प्रकल्प राबविले जाताना प्रभागातही अनेक संकल्प सिद्धीस नेण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग २४ मधील उमेदवारांनी केला असल्याचे गणेश बिडकर यांनी सांगितले. वाहतुकीचे नियोजन आणि त्यासाठी ठोस उपाययोजना करतानाच कमला नेहरू रूग्णालयाच्या आरोग्यसुविधांचे बळकटीकरण करणे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी संविधान सन्मान अभ्यासिकेचाही उच्चार या संकल्पपत्रात आहे.
या संकल्पपत्राबद्दल बोलताना बिडकर म्हणाले, दिलेला शब्द पाळणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हा भारतीय जनता पक्ष आणि माझ्यासाठी कर्तव्याचा भाग आहे. प्रभागात नव्या सुविधा निर्माण झालेल्या अनुभवण्यास मिळतील, याची खात्री बाळगा. शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक मोठे आणि दीर्घकालीन हिताचे प्रकल्प हाती घेतले आहेत. यातील मेट्रो, नदीकाठ सुधारणा, चोवीस तास पाणीपुरवठा या प्रकल्पांचा थेट लाभ प्रभागातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, असे सांगून बिडकर म्हणाले, मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे प्रभागातील नागरिकांना शहराता कोठेही आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर पुण्यात इलेक्ट्रिक बसेसमुळेही नागरिकांना सुखद प्रवास करता येईल. मध्यवर्ती पुण्यासाठी सोयीची असलेली पुण्यदशम सेवा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू कऱण्याचाही आमचा संकल्प असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यात काही तासात मोठा पाऊस होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. याच्यामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येते आणि हे पाणी वस्त्या आणि सोसायट्यांत शिरते. ही समस्या लक्षात घेत नाल्यांना सीमाभिंती बांधणे आणि कल्व्हर्टची कामेही प्रगतिपथावर असून शिरणारे पाणी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर आमचा भर असल्याचेही बिडकर यांनी सांगितले. प्रभाग २४ हा मूळ शहराचा भाग असल्याने रस्ते रूंदीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे गर्दीच्यावेळी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो.
बेशिस्त पार्किंगमुळे आणखी गोंधळ निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणून विशेष नियंत्रण व्यवस्था निर्माण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभागातील सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही आणि पेट्रोलिंगची व्यवस्था अधिक मजबूत करणार आहे, असेही बिडकर यांनी सांगितले. प्राचीन वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन, हाही महत्वाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...म्हणूनच पुण्यामध्ये सत्तेवर येणार आहे महायुती : रामदास आठवले
‘आम्हाला करायची आहे दुश्मनांची माती, म्हणूनच पुण्यामध्ये सत्तेवर येणार आहे महायुती,’ अशा मिश्किल शब्दांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवार पेठेत मतदारांशी संपर्क साधत प्रभाग क्रमांक २४ मधील भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. शनिवारी रात्री प्रभाग २४ मधील भाजपा उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह उज्ज्वला यादव आणि देवेंद्र वडके आणि कल्पना बहिरट यांच्या प्रचारासाठी आठवले यांच्या उपस्थितीत भिमनगर परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. उत्साहात पार पडलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर झालेल्या सभेत आठवले म्हणाले “महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी मी इथे आलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी, सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही भाजपासोबत आहोत. आपण सारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांना मानणारे लोक आहोत. लोकांनी लक्षात ठेवावे महायुती ही आपली आहे.”