उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात सध्या चारा-पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेळ्या-मेंढ्यांना चारा-पाणी मिळावे यासाठी मेंढपाळांवर रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. या भागात दाखल झालेले मेंढपाळांचे कळप मजल दरमजल करीत जिकडे चारा-पाणी भेटेल तिकडे स्थलांतर करीत आहेत. पाऊस कमी असल्याने चारा, पाण्याच्या प्रश्नाने बारामतीच्या जिरायती भागात गंभीर रूप धारण केले आहे.
चारापाण्याअभावी वाळलेला चारा, बाभळी व निंबाच्या पाल्यावर गुजराण करावी लागत आहे. परिणामी, मेंढपाळ चारा भेटेल त्या ठिकणाी शेळ्या-मेंढ्यांना घेऊन जात आहेत. गावोगावी भटकंती करून शेतात उघड्यावरच संसार टाकण्यासाठी मेंढपाळांना शेतकर्यांना विनवण्या कराव्या लागत आहेत. ज्या शेतकर्यांच्या शेतात पीक नाही अशा ठिकाणी जवळपास चार्याची उपलब्धता व क्षेत्राचा अंदाज घेऊन मेंढपाळ बांधव मुक्काम करीत आहेत. रणरणत्या उन्हातान्हात मेंढ्यांसाठी चार्याची तजवीज करून ठेवावी लागत आहे.
वणव्यांमुळे गवत जळाले
उन्हाळा आला की चाराटंचाई जाणवते. माळरानावरील वाळलेले गवत चारा म्हणून उपयोगी पडते. परंतु चालूवर्षी माळरानावरील तसेच वनक्षेत्र व खासगी क्षेत्रात लागलेल्या वणव्यांमुळे वाळलेले गवत जळाले. त्यामुळे हा चाराही मिळणे कठीण झाले असल्याचे मेंढपाळांनी सांगितले.