वाल्हे: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्यातील वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुक्कामी जाणार्या मार्गातील सुकलवाडी येथील रेल्वेच्या भुयारी मार्गात दरड कोसळण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या काळात भुयारी मार्ग धोकेदायक ठरण्याची शक्यता आहे.
या भुयारी मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. भुयारी मार्गतून दररोज अनेक जण प्रवास करतात. भुयारी मार्ग दोन्ही बाजूला जवळपास 18 ते 20 फूट उंच आहे. या मार्गात पावसाने दगड-गोटे पाण्याबरोबर वाहत आले आहेत. यामुळे भराव ठिसूळ झाला आहे. त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
मागील दोन-तीन दिवसांपासून या परिसरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळ भुयारी मार्गातील कडेच्या भिंतीवरून पावसाचे पाणी जाऊन भिंतीची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. या मागार्तून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. भुयारी मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, या कामाच्या गुणवत्तेवरच ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली आहे.
याच भुयारी मार्गातून पुढील महिन्यात वारकरी ये-जा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्घटना टाळण्यासाठी भुयारी मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.