पुणे

नानगाव : ‘एफडीए’ला जाग, प्रदूषण विभाग झोपेतच! भेसळयुक्त गुर्‍हाळघरांवर कारवायांचे सत्र

अमृता चौगुले

राजेंद्र खोमणे
नानगाव : सध्या दौंड तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळयुक्त गुर्‍हाळघरांवर कारवायांचे सत्र सुरू आहे. मात्र आरोग्याचा दुसरा प्रश्न विषारी धुराचा असून यासंदर्भात काम करणारा प्रदूषण विभाग अजूनही कुंभकर्णी झोपेतच आहे. त्यामुळे या प्रदूषण विभागाला कुंभकर्णी झोपेतून कधी जाग येणार, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिक करत आहेत.

गेल्या आठवड्यात दैनिक पुढारीने 'विळखा गुर्‍हाळ प्रदूषणाचा' या वृत्तमालिकेतून सडेतोडपणे नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या. वृत्ताची दखल घेत काही भागातील गुर्‍हाळचालकांनी गुर्‍हाळांवर प्लास्टिक, टायर, रबर इत्यादी प्रदूषण करणार्‍या वस्तू न जाळण्याचा तसेच गुळात भेसळ न करण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही दुसरीकडे काही ठिकाणी आजही भेसळयुक्त गूळ व प्रदूषण करणार्‍या वस्तू जाळल्या जात आहेत.

गूळ बनविताना ज्या प्रमाणे भेसळ केली जाते, त्यामुळे हा गूळ खाण्यासाठी योग्य प्रतीचा राहात नाही. त्याचप्रमाणे गुर्‍हाळघरांमधून निघणारा काळाकुट्ट विषारी धूर तितकाच हानिकारक आहे. ज्याप्रमाणे अन्न व औषध विभागाकडून कारवाया सुरू आहेत त्याचप्रमाणे प्रदूषण विभागाकडूनही कारवायांची गरज आहे. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे प्रदूषण विभागाला कुंभकर्णी झोप लागते, याने त्रस्त नागरिक संतप्त आहेत.

अद्यापही लपून-छपून अयोग्य कचर्‍याचा वापर?
प्रदूषण करणार्‍या वस्तू सध्या काही ठिकाणी लपवून ठेवल्या असून रात्री या वस्तूंचा वापर गुर्‍हाळचालक करत असल्याचे शेजारचे त्रस्त नागरिक बोलून दाखवत आहेत. मात्र एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाया सुरू असल्याने गुर्‍हाळमालकांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून येत आहे. सध्यातरी काही भागात गुर्‍हाळचालकांनी या कारवायांमुळे धास्ती घेतली आहे. मात्र काही भागात अजूनही लपूनछपून गुळात भेसळ करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

SCROLL FOR NEXT