अजय कांबळे
कुरकुंभ(पुणे) : पुणे-दौंड-भिगवण या दरम्यानच्या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गावर मागणी असलेली विद्युतीकरणावर धावणारी (इलेक्ट्रीक) लोकल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे ठोस माहिती दिली जात नाही. लोकल सेवा नेमकी कधी सुरू होणार हा प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे. त्यामुळे प्रवासी व नागरिकांचे लोकलचे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले आहे.
सन 2007 रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-गुंटकल या 664 किलोमीटर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाला मंजुरी देण्यात आली. सन 2012 रोजी प्रत्यक्षात विद्युतीकरण कामाला सुरुवात झाली. सन 2016 रोजी पुणे ते दौंड आणि गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी दौंड ते भिगवणदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बहुतांश रेल्वे डिझेलऐवजी आता इलेक्ट्रीक इंजिनच्या माध्यामातून धावत आहेत.
पुणे-लोणावळाप्रमाणेच जिल्ह्यात पुणे-दौंड-भिगवण अशी इलेक्ट्रीक लोकल सुरू करण्याची मागणी होती. विशेषतः दौंड तालुक्यातून या इलेक्ट्रीक लोकलसाठी मोठी अपेक्षा आहे. मात्र, इलेक्ट्रीक लोकल अद्याप रुळावर आलेली नाही. याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. जणू काय लोकलचा विसर पडला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वास्तविक पाहता लोकलमुळे जिल्ह्यातील पुणे, घोरपडी, हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, उरळी कांचन, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस, दौंड, बोरीबेल, मलठण, भिगवण, बारामती यांसह अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी, श्रीगोंदा, कर्जत या भागातील प्रवाशी, विद्यार्थी, नोकरदार, कामगारवर्ग व नागरिकांना चांगली सोय होणार आहे.
विद्युतीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा फलाटची रचना, लोकलच्या डब्यांची रचना, लोहमार्ग व विद्युतीकरणाच्या खांबांमधील अंतर अशा महत्त्वाच्या तांत्रिक मुद्द्यांचा रेल्वे प्रशासनाने विचार करण्याची गरज होती. यापैकीच काही मुद्द्यांवर गंभीर असे तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्यामुळे लोकल सेवा सुरू होत नसल्याचे बोलले जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
इलेक्ट्रीक लोकलची मागणी असताना रेल्वे प्रशासनाने डिझेलवर धावणारी (डीएमयू) डिझेल मल्टिपल युनिट आणि (मेमू) मेन लाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट रेल्वे सुरू केली. या गाड्याच्या लोकलसारख्या दिसणार्या बोगींना पाहून समाधान मानावे लागत आहे. याबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी आहे. पुणे, दौंड, भिगवण हे अंतर कापण्यासाठी पूर्वीच्या डिझेलवरील रेल्वे गाड्यांना जितका वेळ लागत होता, तितकाच वेळ या नवीन गाड्यांना लागतो. प्रवाशांच्या वेळेची बचत होत नाही. त्यामुळे विद्युतीकरणाचा काय फायदा असा प्रश्न निर्माण होत आहे.