वाघोली: आव्हाळवाडी फाटा चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड लावून चौकातील यू-टर्न बंद केले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र दिसून येत असून, वाहनचालक आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या 1 मेपासून आव्हाळवाडी फाटा ते लोहगाव रोडकडे जाणाऱ्या महामार्गावर बॅरिकेड लावून यू-टर्न बंद करण्यात आले आहेत. परिणामी, लोहगाव आणि पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना आता केसनंद फाट्यावरून वळसा घ्यावा लागत असल्याने प्रवास अधिक वेळखाऊ ठरत आहे.
परिणामी, वाघेश्वर मंदिर परिसरात लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणतीही ठोस योजना किंवा पूर्वसूचना न देता अचानक केलेल्या बदलामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वाहनचालक आणि नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहनचालकांवर तत्काळ कारवाई केल्यास वाहतूक कोंडी कमी शकते. तसेच वाहनचालकांनीही देखील बेशिस्त वाहन पार्किंग टाळून वाहतुकीची शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आव्हाळवाडी फाट्यावरील यू-टर्न बंद करण्याचा निर्णय वाहनचालक आणि नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरत आहे. कोणतेही नियोजन न करता घेतलेल्या या निर्णयामुळे रोजच्या प्रवासात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी या चौकातील वाहतुकीचा परिपूर्ण अभ्यास करूनच योग्या त्या उपाययोजना कराव्यात.प्रदीप आव्हाळे, रहिवासी, वाघोली
या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करण्यात आला आहे. याबाबत बहुतांश नागरिक समाधानी आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अजून काही सुधारणा करता येतील का? याबाबतही विचार केला जाईल.राहुल कोळंबीकर, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
स्वतंत्र वाहतूक शाखा आणि पुरेसे कर्मचारी असतानाही रस्ते बंद करून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. चौकातील वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू ठेवून सिग्नलवर पोलिस तैनात करावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी.संदीप थोरात, सचिव, ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष