दीपक नायक
वाघोली: उतारवयातील आयुष्याची सुखाने जगता यावे, अशी प्रत्येक ज्येष्ठाची अपेक्षा असते. मात्र, वाघोली परिसरातील एका 91 वर्षीय आजीबाईंच्या वाट्याला आयुष्याच्या संध्याकाळी कठोर संघर्ष आला आहे. पतीला अर्धांगवायू झाल्यानंतर दोन मुले असूनही आधार न मिळाल्याने या दाम्पत्याला गायरान जमिनीवरील झोपडीवजा घरात हलाखीत दिवस काढावे लागत आहेत. मात्र, वाघोली पोलिसांनी या दाम्पत्याला आधार दिला आहे.
पतीच्या औषधोपचाराचा खर्च, दैनंदिन गरजा आणि उदरनिर्वाह यांचा ताळमेळ बसवताना या आजीबाईंची होणारी परवड हृदय पिळवटून टाकणारी आहे. स्वतःला नीट उभे राहणेही कठीण असताना त्या रोज परिसरात फिरून कागद, प्लास्टिकच्या बाटल्या आणि भंगार गोळा करतात. त्यातून मिळणाऱ्या थोड्याफार पैशांतून त्या पतीच्या औषधांची आणि घरखर्चाची जुळवाजुळव करतात. या वयातही न डगमगता सुरू असलेली त्यांची ही झुंज प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे. या कठीण परिस्थितीत वाघोली पोलिसांनी दाखवलेली माणुसकी या दाम्पत्यासाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरली आहे.
पोलिस ठाण्याच्या परिसरातच वास्तव्य असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून काही पोलिस कर्मचारी वेळोवेळी त्यांना मदत करत आहेत. कोणी चहा, साखर, साबण देतो, तर कोणी आर्थिक हातभार लावत आहे. अलीकडेच आजींचा पाय भाजल्याचे लक्षात येताच पोलिस कर्मचारी संभाजी बेंद्रे यांनी तत्परतेने पुढाकार घेत स्वतः औषधे आणून त्यांच्या जखमेवर उपचार केले. तसेच पोलिस ठाण्यामधून पाण्याचीही व्यवस्था करून दिली. त्यांच्या या कृतीतून ‘वर्दीतही माणुसकी असते’ याची प्रचिती आली.
या सेवाभावी कार्यात पोलिस उपनिरीक्षक धनंजय गोंगे, राम ठोंबरे आणि विठ्ठल घुले यांचेही आजींना मोलाची मदत मिळाली. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नसल्याने या दाम्पत्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे. दरम्यान, सणसवाडी येथील एका तरुणाने मदतीचा शब्द दिला असून, जी. के. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष संदीप कटके यांनीही समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या आजींना आधार द्यावा, असे आवाहन केले आहे.
पोलिसच माझी खरी मुलं!
आजींशी संवाद साधताना तिच्या व्यथेला अधिकच धार आली. दोन मुले असूनही आधार मिळत नसल्याची खंत व्यक्त करताना तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले. ’आता पोलिसच माझी खरी मुलं आहेत,’ असे म्हणताना त्यांच्या आवाजातील भावनिक वेदना उपस्थितांचे मन हेलावून गेले..!