Gargi Jadhav SMA Treatment Pudhari
पुणे

Gargi Jadhav Treatment Fund: वाघोलीच्या चिमुकल्या गार्गीसाठी माणुसकी धावली; उपचारांसाठी १० कोटींचा निधी जमा

एसएमए टाईप १ आजाराशी झुंजणाऱ्या गार्गीसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ; झोल्गेन्स्मा इंजेक्शनसाठी निधी उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: दुर्मिळ एसएमए आजाराशी झुंज देणाऱ्या वाघोलीतील एक वर्षाच्या गार्गी संदीप जाधव हिच्या उपचारांसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि अखेर १० कोटी रुपयांचा निधी जमा झाला. १९ ऑक्टोबर रोजी निधी उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने गार्गीच्या उपचारांना लवकरच सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे. एका चिमुकलीचे आयुष्य वाचवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गार्गीला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी (एमएमए टाईप १) हा गंभीर आजार झाला आहे. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. तिच्या उपचारांसाठी 'झोल्गेन्स्मा' हे अत्यंत महागडे इंजेक्शन आवश्यक असून, त्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एवढी मोठी रक्कम उभी करणे जाधव कुटुंबीयांसमोर मोठे आव्हान होते.

गार्गीच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन तिच्या कुटुंबीयांनी १ ऑगस्ट रोजी केले. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मोहीम वेगाने पसरली. विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सर्वसामान्य नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेत आर्थिक मदत केली. छोट्या- मोठ्या देणग्यांतून जमा झालेल्या रकमेमुळे अखेर १९ ऑक्टोबरला १० कोटींचा टप्पा गाठण्यात यश आले.

गार्गीच्या उपचारांसाठी आवश्यक निधी जमा झाल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून उपचार सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. एका वर्षाच्या चिमुकलीसाठी हजारो हात एकवटल्याने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय या मोहिमेतून आला आहे.

तुमच्या प्रत्येकाच्या लहान- मोठ्या मदतीने, प्रार्थनेने आणि सहकार्याने आम्हाला ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करता आली. या कठीण प्रवासात साथ देणाऱ्या सर्व देणगीदारांचे, हितचिंतकांचे आणि पाठीराख्यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू.
जाधव कुटुंबीय
जाधव कुटुंबातील चिमुकली गार्गी हिच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. ही रक्कम जाधव कुटुंबीयांसाठी मोठी होती. श्री गणेश तरुण मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या सभासदांच्या माध्यमातून ५१ हजार रुपयांची मदत करून प्रथम मदतीचा हात पुढे केला आणि या मोहिमेत खारीचा वाटा उचलला. त्यानंतर समाजातील दानशूर व्यक्तींचाही मदतीचा ओघ वाढला. अखेर १० कोटींचा टप्पा पूर्ण झाल्याने मनापासून समाधान वाटते.
सत्यपाल कोल्हे, अध्यक्ष, श्री गणेश तरुण मित्रमंडळ, वाघोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT