वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील उघडकीस आलेल्या 'डस्टबिन' प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत 25 तारखेपर्यंत चौकशी करून अहवाल मागविण्यात आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी दिली.
मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींना कुठलीही मागणी नसताना एका ठेकेदाराने थेट डस्टबिन पोहोच केले असून दुप्पट दराने बिलेही दिली असल्याचा धक्कादायक प्रकार माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, अजीवलीचे सरपंच सचिन शिंदे व पत्रकारांमूळे नुकताच उघडकीस आला.
यासंदर्भात दै.पुढारी ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून हा काळाबाजार उघड केला आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्यासाठी बालविकास प्रकल्पअधिकारी विशाल कोतागडे, विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, अविनाश खैरे यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
या समितीने 25 तारखेपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी भागवत यांनी दिले आहेत. दरम्यान, हा काळाबाजार उघड झाल्यानंतर तालुक्यातील सर्व सरपंच,
ग्रामसेवक यांनी ते डस्टबिन स्वीकारण्यास नकार दिला असून एकही ग्रामपंचायतीचे बिल मिळाले नसल्याने संबंधित ठेकेदारही चांगलाच अडचणीत सापडला आहे. परंतु, या काळ्याबाजाराचा 'म्होरक्या' कोण हे मात्र अजून उघड झालेले नाही, त्यामुळे या 'म्होरक्या'चा शोध सर्वचजण घेत आहेत.