पुणे

बूथवर जाण्याआधीचं मतदान! काँग्रेस शहराध्यक्षासह अनेकांना तोच अनुभव

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यामध्ये विविध ठिकाणी मतदार यादीत नागरिकांना त्यांची नावे सापडत नव्हती, तर काही ठिकाणी मतदार जाण्याअगोदरच मतदान झाले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह कोथरूडमधील पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी आलेल्या एका मुलीला आपल्या नावावर अगोदरच मतदान झाल्याचे मतदान केंद्रावर समजले, त्यावर त्या तरुणीने याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी आवश्यक पुरावे घेऊन उत्साहाने आलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी असे अनुभव बघण्यास मिळाले. अगोदरच मतदान झालेल्या मतदारांसाठी टेंडर मतदान करण्याची व्यवस्था आहे. अरविंद शिंदे हे रास्ता पेठेतील त्यांच्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांचे मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचे टेंडर मतदानाद्वारे मत नोंदवले. दरम्यान, काही मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव मयत असे नोंदवल्याचे आढळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले.

युवक क्रांती दल कार्यकर्ते संदीप बर्वे यांना आणि काँग्रेसच्या बूथवरील कार्यकर्त्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. महात्मा फुले पेठेतील मतदान केंद्रावर मतदान असलेल्या पाच जणांच्या बाबतीत मयत नोंदी असल्याचे आढळून आले. मतदारांच्या नावापुढे मृत नोंद झाल्याचे प्रकार उघडकीस आल्याने बर्वे यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात आली.

कुटुंब एकच, मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर

एकाच कुटुंबातील मतदारांचे मतदान शक्यतो एकाच मतदान केंद्रावर असते. परंतु, या वेळी लोकसभेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान हे वेगवेगळ्या लांबच्या मतदान केंद्रावर नावे होती. परिणामी, एकाचे मतदान झाल्यावर दुसर्‍याचे मतदान करण्यासाठी दुसरे मतदान केंद्र गाठावे लागत असल्याने मतदारांनी याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT