पुणे

नानगाव : गद्दार कोण हे मतदार मतदानातून दाखवतील : विरोधी पक्षनेते पवार

अमृता चौगुले

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात खोके, ओके, गद्दार असे अनेक शब्द ऐकायला मिळत आहेत. महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहिले असून एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्यातील प्रकल्प बाहेरच्या राज्यात जात आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक तरुण-तरुणींना मिळणार्‍या रोजगाराच्या संधी हातातून जात आहेत. त्यामुळे एकमेकांना गद्दार म्हणणार्‍यांना गद्दार कोण आहेत, हे मतदार आपल्या मतदानातून दाखवून देतील, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. पारगाव सा.मा. (ता. दौंड) येथील सभेत ते बोलत होते.

नवीन सरकार आल्यापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जिथे जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा, असे आम्ही सांगितले; मात्र तेदेखील केले नाही. नुकसान भरपाईची रक्कम मिळत नाही, तर ज्या ठिकाणी मिळते ती रक्कम कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याचे पवार म्हणाले.

गेली अनेक वर्षांपासून भीमा पाटस कारखाना बंद आहे. संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळे या कारखान्याची ही परिस्थिती आहे. कामगारांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे. छोट्या-मोठ्या संस्था जर चांगल्या चालल्या तरच शेतकर्‍यांना दोन पैसे मिळतील; मात्र ते बंद पडत असतील तर शेतकर्‍यांनीदेखील त्याची दखल घेणे गरजेचे आहे.

अनेक जण अडचणी सांगतात; मात्र मतदानाच्या वेळी थोड्या मतावरून माझा आमदार पाडता, अशी खंतदेखील यावेळी पवार यांनी बोलून दाखवली. दसरा मेळाव्यात काहींची भाषणे खूपच मोठी झाली. समोरच्या वक्त्याचे भाषण आवडले व ते मनाला पटत असेल तर टाळ्यांची दाद मिळते.

शिवाजी पार्कवरील मेळाव्यात टाळ्यांचा आवाज येत होता, मात्र बीकेसीच्या मैदानावर टाळ्यांचा आवाज येत नव्हता. काहीजण मध्येच उठून जात असल्याचेही चित्र पहावयास मिळत होते. मुख्यमंत्री यांच्या दसरा मेळाव्यातून महाराष्ट्राची पुढची दिशा काय हे सांगायला हवं होते. आमिष दाखवून आणलेली माणसं सभेला थांबत नाहीत, असेही यावेळी बोलताना पवार म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT