पुणे

वेल्हे : वाहतूक कोंडीत अडकले मतदार

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी रविवारी (दि. 18) पुण्यातून पानशेत, वेल्हे भागांत जाणार्‍या शेकडो मतदारांसह पर्यटक पुणे -पानशेत रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीत अडकले. दुपारी बारापर्यंत वाहतुकीची कोंडी फुटली नव्हती. अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याची दखल घेऊन तातडीने वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश पोलिसांना दिले. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. खडकवासला धरणमाथ्यावर पानशेत रस्त्याची एक बाजू रातोरात खोदून ठेकेदार गायब झाला.

ग्रामपंचायतीचे मतदान व सुटीचा दिवस असल्याने सकाळी आठपासून वाहनांची मोठी वर्दळ होती. रस्ता खोदलेल्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले तसेच हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या बंदोबस्तावर तैनात करण्यात आल्याने धरण परिसरात पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याचा फटका वाहतुकीला बसला. खडकवासला गावाच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. शेकडो नागरिक त्यात अडकले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. या रस्त्याचे एका बाजूचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. ठेकेदाराने शुक्रवारी रात्री अचानक उर्वरित अर्धा रस्ता खोदला. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर पीएमपी बस, ट्रक अशी मोठी वाहने अडकून पडली. त्यामुळे तब्बल तीन तास वाहतुकीची कोंडी झाली.

वेल्हे तालुक्यातील कोंडगाव, शिरकोली, टेकपोळे आदी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी पुण्याहून निघालेले शेकडो मतदार वाहतूक कोंडीत अडकले. त्यात खडकवासला धरण चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्टॉलवर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

धरणावर वाहतूक कोंडी झाल्याने भाजी मंडई, गाव व बाह्यवळण रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या.
                                                              – राहुल मते,
                                                   खडकवासला काँग्रेस अध्यक्ष

बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाने समन्वयाने रस्त्याचे काम करावे, अशी विनंती करण्यात येऊनही सुटीच्या दिवशी काम केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
                                                               – सौरभ मते,
                                                               माजी सरपंच

धरणमाथ्यावर अरुंद रस्ता असल्याने तेथे वर्दळ पाहून काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. रविवारच्या घटनेमुळे अधिक खबरदारी घेऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे.
                                                      – ज्ञानेश्वर राठोड,
                                शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT