पुणे : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी आठपासून येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होत असून, या दोन्ही मतदारसंघांतील ७७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा या दोन्ही मतदारसंघांत समावेश आहे. पदवीधर मतदारसंघात ४७, तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी उत्साहात मतदान पार पडले होते. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सोमवारी पार पडले. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.