पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमाप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांची आयोगासमोर 21 ते 25 जानेवारीदरम्यान चौकशी होणार आहे. त्याचसोबत हर्षाली पोतदार आणि शिवाजी पवार यांचीही चौकशी होणार आहे.
1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभाजवळ असलेल्या कोरेगाव भीमा येथे दोन गटांत वाद झाल्याने घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने जाळणे व मालमत्तेचे नुकसान करण्यात झाले. या वेळी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर, तसेच कोंढापुरी भागांत अनेक वाहनांची, दुकानांची तोडफोड करण्यात आली होती.
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. याप्रकरणी चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही समन्स बजावले होते. सन 2018 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने याप्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे.