पुणे

विश्रांतवाडी ‘एसआरए’ योजना : विकसकाच्या नावावरील सदनिका रद्द

अमृता चौगुले

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेच्या पात्रता यादीत विकसकांच्या जवळच्या लोकांसह वस्ती बाहेरील नागरिकांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत दै. 'पुढारी'ने सातत्याने आवाज उठवल्यानंतर सर्व्हे नंबर 46 मधील यादीतील विकसकाचे नाव काढून टाकण्यास प्रधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे विकसकाला लॉटरीत मिळालेली सदनिका रिक्त ठेवण्याचे आदेश 'एसआरए'चे तहसीलदार व्ही. एस. भालेराव यांनी काढले आहेत.

विश्रांतवाडी-एअर पोर्ट रस्त्यावर सर्व्हे नंबर 46 मधील झोपडीपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी एसआरएची फेज 2 इमारत बांधून तयार झाली आहे. या योजनेच्या पात्रता यादीतील लाभार्थीच्या नावावर अंबुज पार्टी ऑफ इंडिया व शब्बीर शेख यांनी आक्षेप घेत तक्रार केली होती. त्यानुसार 'एसआरए'ने केलेल्या चौकशीत राधेश्याम रामेश्वरदास अग्रवाल यांनी स्वतः प्रकल्प विकसित केलेला असतानाही त्यांचे नाव पात्रता यादीत असल्याचे स्पष्ट झाले.

अग्रवाल यांनी आपले नाव नजरचुकीने पात्रता यादीत आले असून, सदनिकेचा हक्क सोडत असल्याचे पत्र एसआरएला दिले. त्यानुसार त्यांना मिळालेली 409 नंबरची सदनिका रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आहेत. अंबुज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण खंदारे म्हणाले की, सर्व्हे नंबर 46 मधील पात्रता यादीमध्ये अनेक बोगस नावे आहेत. याबाबत आम्ही एसआरए विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार अग्रवाल यांचे नाव पात्रता यादीतून वगळण्यात आले आहे.

राधेश्याम अग्रवाल यांचे नाव पात्रता यादीत होते. त्यांचे नाव पात्रता यादीतून वगळण्यास मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे. यामुळे अग्रवाल यांच्या नावे प्राप्त झालेली सदनिका रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या नावे असलेली 409 नंबरची सदनिका नव्याने पात्र होणार्‍या लाभार्थ्यास दिली जाणार आहे.

-व्ही. एस. भालेराव,
तहसीलदार, एसआरए

सर्व्हे नंबर 46 प्रमाणे कळस येथील सर्व्हे नंबर 112 अ व ब मधील पात्रता यादीत विकसकाच्या कार्यालयातील सात, तसेच वस्ती बाहेरील अनेक लोकांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत 'एसआरए'च्या सचिवाकडे तक्रारी केल्या असून, लवकरच त्यांची सुनावणी घेऊन मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

-शब्बीर शेख, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT