Pune Porsche Accident
बिल्डर विशाल अग्रवालला पुन्हा अटक करण्यात आली. Pudhari News Network
पुणे

७२ सदनिकाधारकांची फसवणूक; विशाल अग्रवालला अटक

पुढारी वृत्तसेवा

पुणे : बावधन (खु) परिसरातील नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. या सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या अग्रवाल याला अटक करून त्याला मंगळवारी (दि.२) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

अग्रवाल याला न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवाद करताना सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव म्हणाले, अग्रवाल हा बांधकाम व्यावसायिक असून त्याने ७२ सदनिकाधारकांना सोसाटीसाठी कव्हर पार्किंग, ओपन स्पेस, अ‍ॅमिनिटीज या सुविधांचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्याबदल्यात त्यांच्याकडून वेगवेगळी रक्कम घेऊन नमूद सुविधा दिल्या नाहीत.

अग्रवाल व त्यांच्या अन्य साथीदारांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या जागेमध्ये इतर इमारती बांधून सदनिकाधारकांचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक करून गंभीर स्वरुपाचा गुन्हा केल्याचे दिसून येत असल्याने अग्रवालकडे सखोल तपास करायचा आहे. सोसायटी बांधकाम करताना मंजूर नकाशा व त्यानंतरच्या नकाशामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आहे. सोसायटीधारकांना मानीव अभिहस्तांतरण करून देणे बंधनकारक असतानाही ते करून देण्यास टाळाटाळ केली. यामागे त्यांचा हेतू काय होता? ७२ सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचा कुठे वापर केला यासह अन्य मुद्द्यांचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी जाधव यांनी केली.

काय आहे प्रकरण?

नॅन्सी ब्रम्हा असोसिएटस् या प्रकल्पाचे विकसक असलेल्या अग्रवाल व त्यांच्या अन्य सहकार्‍यांशी ७२ सदनिका धारकांनी सदनिका व अन्य सोयीसुविधा ठरल्याप्रकारे रक्कम देऊन व्यवहार केला. यामध्ये त्यांना नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि.चे मालकीची असणारी पार्किंगची जागा, अ‍ॅमिनिटीजची जागा व ओपन स्पेस सोसायटीला देणे तसेच कनव्हेन्स डीड करून देणे बंधनकारक होते. मात्र, सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी न घेता अग्रवाल व त्यांच्या साथीदारांनी आपसात संगनमत करून फिर्यादी विशाल अडसुळ यांच्या सोसायटीच्या मालकीच्या जागेवर वॅन्टेज टॉवर व वॅन्टेज हाय या दोन इमारती उभारल्या.

यामध्ये प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणी अ‍ॅमिनिटी स्पेस, मोकळी जागा नकाशामध्ये दर्शवून नकाशामध्ये इतर लोकांच्या मदतीने वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजूर करून घेण्यात आले. त्याआधारे, सोसायटीच्या जागेत वॅन्टेज टॉवर या ११ मजली इमारतीत ६६ व्यावसायिक कार्यालये काढली. तर वॅन्टेज हाय या १० मजली इमारतीमध्ये २७ सदनिका व १८ दुकाने बांधून नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. सोसायटीतील सदनिकाधारकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT