पुणे; पुढारी वृत्तसेवा: खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून गाड्यांचा मेंटेनन्स वेळेत होत नाही, आरटीओच्या योग्यता प्रमाणपत्राचे (फिटनेस सर्टिफिकेट) नूतनीकरण वेळेत होत नाही, इन्शुरन्स नसतो, गाड्यांवरील कर वेळेत भरला जात नाही, सर्रासपणे अवैधरीत्या टप्पा वाहतूक करून प्रमाणापेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक केली जाते. विनापरवाना गाड्या सुसाट पळविल्या जातात तसेच गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसते. मोटार वाहन कायद्यातील अनेक नियमांना ट्रॅव्हल्सचालकांकडून केराची टोपली दाखवली जात असून, परिणामी मोठ्या अपघाताच्या घटना राज्यभरात घडत आहेत.
शनिवारी (दि. 8) राज्यात विविध ठिकाणी खासगी वाहतूक करणार्या बसचे अपघात झाले. यात नाशिक येथे पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस जळाली. या घटनेत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर पुणे हद्दीत सारोळा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक खासगी बस कंटेनरला धडकली, तर सप्तशृंगी गड परिसरात एक एसटी बस जळून खाक झाली. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने या ट्रॅव्हल्सचालक, एसटी महामंडळाच्या बससह जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुरविणार्या बससेवांची कडक तपासणीसाठी राज्यभरात तातडीने विशेष मोहीम हाती घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सचालक, एसटी महामंडळ, पीएमपी बस प्रशासनाला परिवहन कार्यालयाच्या यंत्रणेचा धाक राहिलेला नसून, मोटार वाहन कायद्यातील नियमांचा देखील विसर पडल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असून, मोठे अपघात घडत आहेत. यामुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी राज्यभरात तातडीने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
पुण्यात महिन्याला 150 ट्रॅव्हल्स गाड्यांवर कारवाई
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीने रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने नियमित कारवाई सुरू असते. महिनाभरात सरासरी 100 ते 150 खासगी वाहतूकदारांच्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. त्याद्वारे आरटीओला महिन्याला सहा ते सात लाखांपर्यंत दंड आणि कराचा महसूल मिळतो.
वायुवेग पथके वाढविण्याची गरज…
पुणे आरटीओअंतर्गत मोटार वाहन कायद्याचे पालन न करणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी फक्त 4 वायुवेग पथके आहेत. एका पथकात एक चालक, एक मोटार वाहन निरीक्षक आणि एक सहायक मोटारवाहन निरीक्षक यांचा समावेश असतो. शहरात सुमारे 43 लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत.
त्यामुळे कारवाईसाठी ही पथके अपुरी असून, आरटीओ कार्यालयाने पथकांमध्ये वाढ करून नव्याने भरती करण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांची पथके तयार करावीत. त्यांना प्रशिक्षण देऊन कारवाईचा वेग वाढवावा; जेणेकरून नियभंग करणार्या खासगी वाहतूकदारांसह इतर वाहनांकडून मोटार वाहन कायद्यातील नियमांचे कडक पालन केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियमांचे पालन करणे अपेक्षित
आरटीओच्या परवान्याशिवाय गाडी रस्त्यावर उतरवू नये
गाडीची वेळेत फिटनेस तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे
आरटीओ परवान्यासाठी दिलेल्या संख्येइतक्याच प्रवाशांची वाहतूक करावी
अवैधपणे टप्पा वाहतूक करू नये
गाडीमध्ये परस्पर बदल करून मागची बाजू (ओव्हर हँगिंग) वाढवू नये
गाडीमध्ये दोन चालक युनिफॉर्मसह असणे आवश्यक आहे
गाडीमध्ये प्रथमोपचार पेटी असावी
गाडीमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, ती वापरण्याबाबत चालकांना योग्य प्रशिक्षण द्यावे
प्रवाशांकडून जादा भाडे घेऊ नये
एसटी महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा दीडपट भाडेच खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून घ्यावे
गाड्यांचा मेंटेनन्स वेळेत करावा
गाडीचा इन्शुरन्स आणि कर वेळेत भरावा
रस्ते वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने आमच्या पथकांमार्फत दररोज कारवाई सुरू असते. नाशिकला घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात कारवाईसाठी आराखडा तयार करून येथे लवकरच विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. या वेळी नियमभंग करताना आढळलेल्या खासगी वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे