Pune News
पुणे : विमाननगरच्या पबमध्ये गुन्हेगारांनी डीजेवर थाटात बर्थडे पार्टी साजरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या "Three Musketeers" या पबच्या पार्किंगमध्ये काही कथित ‘भाई’ लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातला. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते.
ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही पार्टी झाली तो परिसर विमानतळ पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत (सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा निर्माण करणे) गुन्हा नोंदवलेला आहे. ज्या चौकातील पबमध्ये ही पार्टी झाली, त्याच परिसरात त्याने याआधी पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी केली होती.
या पार्टीत नुकताच 'MCOCA' कायद्यातील गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून सुटून आलेला गुन्हेगार आकाश कंचिलेदेखील त्याच्या टोळीसमवेत उपस्थित होता. ही पार्टी त्याच टोळीचा म्होरक्या निखिल कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. निखिल कांबळे वर येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वीच तो येरवडा जेलमधून सुटून आला आहे.
या डीजे पार्टीमुळे विमाननगर परिसरात प्रचंड चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलिस या प्रकरणात कारवाई करतील का? गुन्हा दाखल केला जाईल का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष बाब म्हणजे, या पार्टीचे अनेक व्हिडिओज इंस्टाग्रामवर शेअर केले असून, या व्हिडिओच्या माध्यमातून ‘भाई’ची दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याची जोरदार चर्चा आहे.