पश्चिम हवेली Pudhari
पुणे

पश्चिम हवेलीतील गावांनाही हवी नगरपालिका!

पुढारी वृत्तसेवा

पुणे शहरालगतच्या पूर्व भागातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका तयार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम हवेलीतून महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांसाठीदेखील स्वतंत्र्य नगरपालिका स्थापन करण्याची माागणी आता जोर धरू लागली आहे.

पुणे महापालिकेत या गावांचा समावेश होऊन पाच वर्षे झाली, तरी प्रशासनाकडून नागरिकांना अद्यापही पाणी, ड्रेनेज, अंतर्गत रस्ते, कचरा, आरोग्य आदी मूलभूत सुविधा पूर्णपणे पुरविता आलेल्या नाहीत. तसेच विकास आराखडादेखील रखडला आहे. प्रशासनाने कर संकलन करण्यात जेवढी तत्परता दाखवली, ती सुविधा व विकासकामे करण्यात का दाखवली नाही? असा सवाल या गावांतील नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

शहरालगतची काही गावे 1995 मध्ये महापालिकेत समाविष्ट केली गेली. त्यानंतर गावे वगळणे व नंतर पुन्हा समाविष्ट करणे आणि आता पुन्हा काही गावे वगळणे, अशा घडामोडी सातत्याने राज्य शासनाच्या स्तरावर घडत आहेत. याच रेट्यात फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून बाहेर पडली. आता हवेली तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठीदेखील स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दोन गावांना स्वतंत्र नगरपालिका मिळत असेल, तर या गावांना का नाही, असा प्रश्न उपस्थित करून स्वतंत्र नगरपालिकेसाठी लोकभावना आता तीव— होऊ लागल्या आहेत.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक गावांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढते नागरीकरण आणि उद्योगधंद्यांच्या विस्तारामुळे मूलभूत सुविधांवर ताण पडून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. समाविष्ट गावांचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे तसेच नागरिकरण वेगाने होऊ लागल्याने महानगराच्या सुनियोजित विकासाला खो बसतो आहे. 10 ते 15 वर्षांत महापालिकेतून ज्या गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून विकासकामे केल्यानंतर तीच गावे पुन्हा वगळून नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला जातो आहे.

या गावांतून होतेय मागणी

आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, गुजरवाडी- निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, धायरी, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, सणसवाडी, खडकवासला, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे-धावडे या हवेली तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गावांसाठीदेखील स्वतंत्र नगरपालिका स्थापन करणे फायद्याचे ठरेल, असा सूर नागरिकांतून आता उमटू लागला आहे.

हवेलीच्या पश्चिमेकडील गावांचा विकास व्हावा, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होऊ लागली आहे. स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्यासंदर्भात राज्य सरकारला निवेदन दिले आहे. या गावांसाठी सरकारने स्वतंत्र नगरपालिका स्थापन करून नागरिकांना न्याय द्यावा.
नितीन जांभळे, नागरिक, जांभूळवाडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT