पाटस : पुढारी वृत्तसेवा : कुसेगावच्या (ता. दौंड) रूपनवर वस्तीवर सुरू असलेले बंधार्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विजयावाडी तलावातून निर्माण होणार्या रूपनवरवस्ती येथील ओढ्यावर सिमेंटचा बंधारा आहे. सध्या या बंधार्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात विजयावाडी तलावातील अतिरिक्त पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून ते या सिमेंटच्या बंधार्यात जमा होते.
त्यामुळे या बंधार्याचे तळापासूनचे काम भक्कम स्वरूपाचे होणे आवश्यक आहे. मात्र, तसे काम संबंधित ठेकेदाराकडून होत नसल्याचे ग्रामस्थांनी केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बंधार्याचे सुरू असलेले काम बंद पाडले.
ग्रामपंचायत गावातील प्रत्येक कामांवर लक्ष देऊन चांगले काम करून घेत असते. त्यामुळे निकृष्ट कामाला पाठीशी घातले जाणार नाही. रूपनवर वस्ती येथे सुरू असलेल्या सिमेंट बंधार्याची ग्रामस्थांनी पाहणी करून ते काम तत्काळ थांबवले आहे.
– शर्मिला शितोळे, सरपंच, कुसेगाव