पुणे

भारनियमनाने रावणगावचे ग्रामस्थ त्रस्त; महावितरणला आंदोलनाचा इशारा

अमृता चौगुले

रावणगाव(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : भारनियमन तसेच कृषिपंपाचा बंद केलेला वीजपुरवठा आदी कारणांमुळे रावणगाव येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजेअभावी दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे. तसेच शेतीपिकांचेही मोठे नुकसान होत आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या उन्हाळ्याची झळ सर्वत्र जाणवू लागली आहे. शेतीपिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही चालू आहेत.

अशा काळातच महावितरणकडून वीजबील वसुलीच्या नावाखाली भारनियमन सुरू करण्यात येत आहे. रावणगाव परिसरालाही महावितरणच्या या कारभाराचा फटका बसत आहे. परिसरातील कृषिपंपांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर घरगुती वीजपुरवठा देखील वारंवार खंडित होत आहे.

त्यातच भारनियमनदेखील करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांना पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. विजेअभावी नागरिकांची दैनंदिन कामेही खोळंबून रहात आहेत. व्यवसायिकांनादेखील याचे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतातील पिकांनाही विजेअभावी पाणी मिळत नसल्याने ती जळून जाऊ लागली आहेत. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून, रात्री वीज नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

येथील वीज उपकेंद्रात अधिक क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविल्यास भारनियमनातून दिलासा मिळू शकतो. या संदर्भात कुरकुंभ येथील महावितरणचे सहायक अभियंता एस. जी. आवताडे यांच्याकडे मागणी करण्यात आली. मात्र, मबघू… करू… सांगतो..फ अशी उत्तरे देत आवताडे टाळाटाळ करत आहेत. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण यांनी महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांशी याबाबत चर्चादेखील केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT