Vikram Kakade Victory Statement Pudhari
पुणे

Vikram Kakade Victory Statement: बिनविरोध निवडून आल्यानंतर काकडेंची भावनिक प्रतिक्रिया; महायुतीसह शरद पवार यांनाही दिले विजयाचे श्रेय

हा विजय दिवंगत अजितदादांना समर्पित करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय महायुतीतील सर्व घटक पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही दिले. तसेच हा विजय दिवंगत अजितदादांना समर्पित करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना काकडे म्हणाले, की या यशामागे महायुतीतील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे योगदान आहे. शरद पवार यांचेही या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान राहिले आहे. स्व. अजित दादा आज आपल्यात असते तर त्यांना या विजयाचा सर्वाधिक आनंद झाला असता. त्यामुळे हा विजय त्यांच्या स्मृतीला समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारीची संधी दिल्याबद्दल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबाबत विचारले असता काकडे यांनी त्या निर्णयाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घोडेबाजाराच्या चर्चेबाबत बोलताना काकडे म्हणाले की, या मतदारसंघातील सुमारे 95 टक्के मतांचे संख्याबळ महायुतीकडे होते, तर महाविकास आघाडीकडे अत्यल्प मते होती. त्यामुळे अशा परिस्थितीत घोडेबाजाराची वेळ कोणावर आली असती, याचा विचार जनतेने करावा.

जय पवार यांना दिलेल्या कर्जासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, जय पवार यांना दिलेली रक्कम कर्ज म्हणून नव्हे तर जमीन व्यवहारापोटी दिली होती. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि उमेदवारीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही विश्वासात घेण्यात आले होते, असे सांगत काकडे यांनी महायुतीतील समन्वय अधोरेखित केला. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT