पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीतील सर्व राजकीय तर्क-वितर्कांना आणि बंडखोरीच्या नाट्यमय प्रवासाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीमधील तडजोडीचे राजकारण आणि महाविकास आघाडीने घेतलेली माघार यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवारांनी ऐनवेळी रिंगणातून माघार घेतल्याने काकडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा 22 जून रोजी करण्यात येणार आहे.
पुणे विधान परिषद मतदारसंघावर आपला दावा सांगत राष्ट्रवादी कॉंग््रेासने बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडेला उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीवरून पक्षात वाद उफाळून आला होता. मात्र, अंतर्गत वाद शमवण्यात पक्षनेत्यांना यश आले. गुरुवारी (दि. 4 जून) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.
महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग््रेासच्या (अजित पवार गट) वाट्याला गेला होता. मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत अस्वस्थता आणि संभम निर्माण झाला होता.
दरम्यान, प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यामुळे ते अर्ज माघारी घेतील अशी चर्चा होती. मात्र, अर्जमाघारीच्या दिवशी त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. अर्ज माघारी घेण्यास काही अवधी राहिला होता.
यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. शेवटच्या दिवशी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी चक्रव्यूह फिरवत मध्यस्थी केली. अखेर शेवटच्या क्षणी आमदार राहुल कुल यांच्यासोबत प्रदीप कंद हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी ‘महायुतीचा धर्म’ पाळत पक्षाच्या आदेशाचा मान राखला आणि आपली उमेदवारी मागे घेतली.
पक्षनेत्यांचा फोन आणि श्रीकांत पाटील यांची माघार
दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील ही निवडणूक लढवण्याचे ठरवत श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी कॉंग््रेासचे टेन्शन वाढवले होते. त्यामुळे या निवडणुकीत काकडे विरुद्ध पाटील अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी बंडखोर प्रदीप कंद यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे काकडे यांच्यासमोर पाटील यांचे आव्हान होते.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग््रेासच्या दिग्गजांनी प्रयत्न सुरू केले. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत विनंती केली होती.
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी देखील दोन्ही पक्षांमध्ये सकाळपासून तडजोडीवर चर्चा सुरू होती. अखेर वरिष्ठांच्या सूचनेनुसार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
राष्ट्रवादीला बंडखोरी शमवण्यात यश; दोन ‘एबी’ फॉर्मचा पेच सुटला
निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी केवळ विरोधकांशीच नव्हे, तर पक्षांतर्गत पेचाशीही राष्ट्रवादीला लढावे लागले होते. विक्रम काकडे यांच्यासोबतच माजी आमदार सुनील टिंगरे यांनीही अधिकृत ‘एबी फॉर्म’सह अर्ज दाखल केल्याने पक्षाचा खरा उमेदवार कोण? याबाबत मोठा सस्पेन्स तयार झाला होता. अखेर पक्षनेत्यांनी आदेश दिल्यावर सुनील टिंगरे यांनी माघार घेतली. यामुळे विक्रम काकडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
निवडणूक अधिकाऱ्यांनी केली बिनविरोध निवडीची घोषणा
प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गजानन पाटील यांनी या सर्व माघारींची अधिकृत घोषणा केली. प्रदीप कंद, श्रीकांत पाटील, सुनील टिंगरे यांच्यासह तुषार कामठे आणि सुनील जरे या पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर विक्रम काकडे हेच एकमेव वैध उमेदवार रिंगणात उरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा 22 जून रोजी करण्यात येणार आहे