पुणेय पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती बुधवारी दुपारनंतर अचानक खालावली आणि विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जाऊ लागली. गोखले लाईफ सपोर्ट सिस्टिमवर असून, डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुढील मेडिकल बुलेटिन जाहीर केले जाणार आहे.
चित्रपट, नाटक अणि मालिका अशा तिन्ही कलाक्षेत्रांत लीलया मुशाफिरी करणारे आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे…स्पष्ट भूमिका मांडतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे विक्रम गोखले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे 5 नोव्हेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे. बुधवारी दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विक्रम गोखले यांची 4 महिन्यांपूर्वी एन्डोस्कोपी करण्यात आली होती. घशाच्या त्रासाबरोबरच त्यांना पोटाचा त्रास सुरू झाला होता. त्यांना मधुमेहाचा त्रासही जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदराचा त्रासही सुरू झाला. यामध्ये पोटात द्रव पदार्थ साचून राहतो. गोखले यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचेही समजते. अर्थात, याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टरांनी 'ऑन रेकॉर्ड' प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
घशाच्या त्रासासह हृदयाशी, किडनीशी निगडित त्रासाने त्रस्त
विक्रम गोखले यांना काही वर्षांपूर्वीपासून घशाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे नाटकात काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या 'गोदावरी' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना हृदयाशी आणि किडनीशी संबंधित त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी उर्वरित शूटिंग पूर्ण केले.
विक्रम गोखले यांची प्रकृती कालपासून चिंताजनक आहे. त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. जोपर्यंत डॉक्टर अधिकृतपणे काही माहिती देत नाहीत, तोवर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
– राजेश दामले, कौटुंबिक मित्र
गोखले कुटुंबाची आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांची एक बैठक पार पडली. सध्या विक्रम गोखले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टर प्रयत्न करीत आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजता मेडिकल बुलेटिन होईल.
– शिरीष याडगिकर, जनसंपर्क अधिकारी, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल