राधाकृष्ण विखे पाटील, सत्यशील शेरकर  (Pudhari File Photo)
पुणे

Junnar Politics: जुन्नर तालुक्याच्या राजकारणात ट्विस्ट? शरद पवारांच्या विश्वासू साथीदाराची विखेंसोबत बंद दाराआड चर्चा

Satyashil Sherkar Junnar: शेरकर भाजपाच्या गळाला लागणार का?

पुढारी वृत्तसेवा

Junnar Radhakrishna Vikhe Patil Satyashil Sherkar Meeting

नारायणगाव: विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,आणि विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी दोन दिवसापूर्वी जलसंपदा मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी भेट देऊन बंद दाराआड चर्चा केल्यामुळे जुन्नर तालुक्यातील राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणारे सत्यशील शेरकर आपल्या निवासस्थानी भाजपचे जेष्ठ नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी गुप्तंगु करीत असल्यामुळे आता अजित पवार यांच्या ऐवजी भाजपत जाणार आणि भाजपाला जुन्नर तालुक्यासाठी एक वजनदार नेता मिळणार अशी ही चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान सध्या राज्यामध्ये महायुतीचे सरकार असले तरी 2029 ची विधानसभा निवडणूक भाजपा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वबळावर लढण्याची तयारी करत असून प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहे. सत्यशील शेरकर यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघा सात हजार मतांनी पराभव झाला आहे. या निवडणुकीनंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जवळजवळ साथ सोडल्यात जमा आहे. निवडणुकीनंतर ते पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले नाहीत व त्या पक्षाच्या व्यासपीठावर देखील दिसले नाहीत. एवढेच नाही तर मला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक जण प्रयत्न करत होते त्यामुळे मी नाराज आहे असे वक्तव्य शेरकर यांनी काही माध्यमांशी बोलताना केले आहे.    

दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे हे मूळचे काँग्रेसचे असल्याने विखे व शेरकर यांच्या कुटुंबाचे गेल्या अनेक वर्षाचे राजकीय संबंध आहे. त्यामुळे विखे यांनी सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी जाऊन सत्यशील शेरकर यांना आपल्या पक्षात येण्यासंदर्भात गळ घातली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शेरकर जर भाजपत आले तर जुन्नर तालुक्यामध्ये या पक्षाची ताकद अधिक मजबूत होऊन 2029 च्या विधानसभा निवडणुकीला या पक्षाला तगडा उमेदवार मिळू शकतो.

सत्यशील शेरकर हे भाजपात जाणार का याबाबत जरी स्पष्ट बोलत नसले तरी त्यांना विघ्नहर सहकारी साखर कारखाना चालवताना काही राजकीय अडचणी येऊ नये म्हणून ते अजित पवार यांच्याही संपर्कात आहेत.

भारतीय जनता पक्ष धूर्तपणे त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करू शकतो. दोन दिवसापूर्वी शेरकर व विखे यांची बंद दराआड झालेली चर्चा ही जुन्नर तालुक्याच्या राजकारणाला भविष्यकाळात कलाटणी देणारी ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT