Vidyanand Bapat Madhurjag Foundation Pudhari
पुणे

Vidyanand Bapat: डीजेच्या दणदणाटाविरोधात एकट्याने आवाज उठवला; विद्यानंद बापटांचा होणार जंगी सत्कार, 2 लाखांचा गौरवनिधी उभारणार

Vidyanand Bapat Pune Noise Pollution: पुणे महानगरपालिकेतील गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट चर्चेत आले आहेत.

Rahul Shelke

Vidyanand Bapat Pune Noise Pollution: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराविरोधात आवाज उठवणारे सजग नागरिक विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. ध्वनिप्रदूषणाच्या समस्येविरोधात भूमिका मांडल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. येत्या रविवारी, 27 सप्टेंबर 2026 रोजी पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, कार्यक्रमाची नेमकी वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

भगतसिंग जयंतीचे औचित्य साधून हा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मधुरजग फाउंडेशनचे कुमार नागे यांनी दिली आहे. ध्वनिप्रदूषणासारख्या गंभीर नागरी समस्येविरोधात आवाज उठवणाऱ्या बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमाला नागरिकांनी आणि समविचारी व्यक्तींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव 2026 च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत विद्यानंद बापट यांनी डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला होता. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली होती.

मात्र, त्यांच्या या भूमिकेला गणेश मंडळातील काही कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. बापट यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली.

दरम्यान, ध्वनिप्रदूषणाविरोधात बापट यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या सत्कारासोबतच त्यांना गौरवनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सध्या दोन लाख रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट प्रसिद्ध करण्यापूर्वीच सुमारे एक लाख रुपये जमा झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी नागरिकांना आर्थिक योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. इच्छुकांनी मधुरजग फाउंडेशन (Madhurjag Foundation) या नावाने असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या कोंढवा शाखेतील खात्यात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुण्यासह अनेक शहरांमध्ये सातत्याने चर्चेत असतो. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील डीजे, ध्वनिक्षेपक आणि इतर ध्वनीवर्धक उपकरणांच्या वापरामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर सार्वजनिक पातळीवर आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र उत्सवाचा आनंद घेताना ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण तसेच इतर नागरिकांना होणारा त्रासही लक्षात घेणे आवश्यक आहे. याच मुद्द्यावरून बापट यांनी आपली भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे.

एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि दुसरीकडे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न, यामुळे आगामी काळात पुण्यात या विषयावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. उत्सव साजरा करण्याचा अधिकार आणि नागरिकांच्या शांततेच्या अधिकारामध्ये समतोल कसा साधायचा, हा या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे.

विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवर मतमतांतरे असली तरी ध्वनिप्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधल्यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून या विषयावर व्यापक जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

27 सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या या सत्कार कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असून, ध्वनिप्रदूषणाच्या समस्येविरोधात भूमिका घेणाऱ्या नागरिकांनी तसेच समविचारी व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT