पुणे

Vidyanand Bapat Attack: पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला

Vidyanand Bapat Latest News: टिळक रस्त्यावरील कशाळे चौकातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Pune Vidyanand Bapat Attack

पुणे : गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाविरोधात सातत्याने भूमिका घेणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

डीजेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानंद बापट हे कशाळे चौकात नागरिकांशी संवाद साधून गणेशोत्सवातील डीजेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि कार्यकर्त्यांनी बापट यांना बेदम मारहाण केली.

डीजेच्या धुमाकुळाविरोधात बापट यांनी घेतलीय ठाम भूमिका

डीजेच्या धुमाकुळाविरोधात आणि आवाजाच्या प्रदूषणाविरोधात बापट यांनी ठाम भूमिका घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराविरोधात आवाज उठवणारे सजग नागरिक विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. गणेशोत्सव 2026 च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत विद्यानंद बापट यांनी डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला होता. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला गणेश मंडळातील काही कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. बापट यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते.

सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई होणार

विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बापट यांना मारहाण करताना एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणी अन्य बाजूंनी तपास सुरू आहे.

बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा समविचारी कार्यकर्त्यांकडून निषेध

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र उत्सवाचा आनंद घेताना ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण तसेच इतर नागरिकांना होणारा त्रासही लक्षात घेणे आवश्यक आहे. याच मुद्द्यावरून बापट यांनी आपली भूमिका मांडली असून, आता त्यांना मारहाण झाल्याने समविचारी कार्यकर्त्यांकडून या मारहाणीचा निषेध करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT