पुणे

पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात लाखो अनुयायी सहभागी झाले होते. अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. भीम अनुयायी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

सोहळ्यासाठी 8 हजारपेक्षा अधिक पोलिस अधिकारी – कर्मचारी, 746 होमगार्ड्स आणि राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे 100 सीसीटीव्ही, 10 ड्रोन कॅमेरे, शंभर दुचाकीस्वार, 10 दहशतवाद विरोधी पथकांची नियुक्ती केली होती. सलग 30 तास बंदोबस्त होता. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे 185 सीसीटीव्ही आणि 350 वॉकीटॉकी, 6 व्हिडीओ कॅमेर्‍याच्या माध्यमातून सर्व हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जयस्तंभाची सजावट, परिसरातील नियोजन उत्तमरीतीने केले. गेल्या वर्षापेक्षा अधिक स्वच्छता हे यावेळचे वैशिष्ट्य होते. सोहळ्यानंतरही रात्रीच सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेषत: विजयस्तंभ व वाहनतळ परिसरातील 1 हजार 500 शौचालय सातत्याने स्वच्छ ठेवण्याचे काम आव्हानात्मक होते, ते स्वच्छता कर्मचार्‍यांनी चांगल्यारीतीने केले. हिरकणी कक्षांचा 168 महिलांनी लाभ घेतला.

बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाने हा संपूर्ण सोहळा योग्यरीतीने पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एसडीआरएफ, एनडीआरएफसारख्या संस्थांचेही आपत्ती व्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले. महावितरणने पथक नियुक्त केले होते. पीएमपीएमएलतर्फे 31 जानेवारी रोजी तोरणा पार्किंग (शिक्रापूर ते कोरेगाव) 35 बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्किंग ते वढू या मार्गावर 5 मिनी बस उपलब्ध करून देण्यात आल्या. लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोलनाका 40 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.

SCROLL FOR NEXT