वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांच्या पाळीव जनावरांवर लम्पी या कातडी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. या भयानक स्थितीत पुरंदर तालुक्यातील सरकारी जनावरांचे दवाखाने हे कंत्राटी कर्मचारी, पशुवैद्यकांच्या भरवशावर सुरू आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांना कायमस्वरूपी पदभरतीचे ग्रहण लागलेले आहे. जिल्हा परिषद आणि शासनाच्या तालुक्यातील 18 पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील राज्य शासनाचे 6, तर जिल्हा परिषदेच्या एका डॉक्टरची कायमस्वरूपी जागा रिक्त आहे. या जागेवर कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी तालुक्यातील पशुपालकांकडून होत आहे.
तालुक्यामध्ये नारायणपूर, पांगारे, जेजुरी, बेलसर, चांबळी, मांढर, मांडकी या सात गावांत जनावरांचे दवाखाने आहेत. या दवाखान्यांची भयानक स्थिती आहे. 7 दवाखान्यांतील 5 पशुवैद्यकीय दवाखान्यांत कंत्राटी डॉक्टर आहेत. जेजुरी, नारायणपूर या ठिकाणी शासन नियुक्त केलेले डॉक्टर असून, या सातही गावांमधील पशुवैद्यकीय दवाखान्यांत एकही शिपाई नाही. यामुळे महाराष्ट्र शासनाचे पशुवैद्यकीय विभागाकडे झालेले दुर्लक्ष दिसून येत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत काळदरी येथील दवाखान्यांमध्ये, तात्पुरत्या स्वरूपातील कंत्राटी पशुवैद्यक डॉक्टर आहेत. गुळुंचे येथील दवाखान्यांमध्ये शिपाई पदाची जागा रिक्त आहे. तालुक्यातील बहुसंख्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची गरज सद्यःस्थितीत आहे.
लम्पी रोगाचा किंवा अन्य कोणत्याही रोगाने शिरकाव पुरंदर तालुक्यामध्ये झाला, तर पुढील काळात भयानक स्थिती ओढाऊ शकते. अपुरे मनुष्यबळ, अपुर्या सोयीसुविधा यामुळे पशुधन धोक्यात येऊ शकते. यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलून, पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीमध्ये भरलेले कर्मचारी वर्गाच्या जागेवर कायमस्वरूपी, त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी पशुसंवर्धकांकडून करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यात 20 व्या पशुगणनेनुसार अंदाजे 1 लाख 24 हजार 832 पशुधन आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, सद्यःस्थितीत फक्त गायीसाठी लम्पी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यात गायीची संख्या 46328 आहे. सद्यःस्थितीत लम्पी लसीकरण फक्त गायीसाठीच करण्यात येत आहे. जवळपास 70 टक्के गायींचे लम्पी लसीकरण झाले आहे. लम्पी आजाराचे अद्याप एकही जनावर आढळून आलेले नाही. लवकरच तालुक्यातील सर्व गायींचे लम्पी लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशुवैद्यकीय विभागास संपर्क करावा.
– डॉ. अस्मिता सताळकर पशुधन विकास अधिकारी विस्तार पं. स. पुरंदर