पुणे: श्यामची आई चित्रपटात बालकलाकाराची भूमिका सादर करणारे श्यामची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा, अभिनेता-दिग्दर्शक अमित वझे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी दुपारी 2 ते 5 ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 5.00 PM वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील. माधव वझे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
२१ ऑक्टोबर १९३९ रोजी माधव वझे यांचा जन्म झाला. वाडिया काॅलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते. १९५३ सालच्या श्यामची आई चित्रपटातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले. (Latest Pune News)
यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून काही चित्रपटात काम केले. बापजन्म,३ इडिअट्स, डिअर जिंदगी, एवढंस आभाळ अशा हिंदी, मराठी चित्रपटात देखील त्यांनी काम केलं. ३ इडिअट्स जॉय लोबोच्या बाबांची भूमिका माधव वझे यांनी साकारली होती. हॅम्लेट या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन देखील केलं होतं. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी , नंदनवन अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.