सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षी बारामती तालुक्यात तसेच धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने निरा नदीवरील बंधार्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दरवर्षी निरा नदीवरील तुडुंब भरून वाहणार्या बंधार्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कायम बागायती पट्टा म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर व माळेगाव परिसराला भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. पाण्याअभावी जिरायती भागातील ऊस पिके जळून गेल्याने जनावरांच्या पाण्याचा व चार्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निरा नदीवरील बंधार्यामुळे निंबूत, मुरूम, होळ, कोऱ्हाळे भागातील ऊस, गहू, हरभरा, चारापिके, तरकारी आणि पालेभाज्या पिकांना फायदा होतो. पाण्यामुळे या भागातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे. मात्र, अत्यल्प पाणीसाठ्यामुळे चालू वर्षी या भागाला दुष्काळाच्या झळा जाणवणार आहेत.
दरवर्षी मे, जून- जुलैपर्यंत बंधार्यातील पाणीसाठा टिकून राहत होता. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबरमध्येच पाणीसाठा कमी झाला आहे. उन्हाळ्यापर्यंत अजून पाणीसाठा कमी होणार असल्याने कायम बागायती पट्टा म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर परिसराला दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. निरा नदीत सध्या कमी पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यापर्यंत हे पाणी टिकण्याची शक्यता फारच कमी आहे.
सर्वाधिक फटका बसणार उसाला
सध्या विहिरी, कुपनलिका, निरा नदी व निरा डावा कालव्यावर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. पाऊस कमी झाल्याने परिसरातील ओढे, नाले, विहिरी, तळी भरून वाहिली नाहीत. शिवाय वीर धरणातही कमी पाणीसाठा असल्याने भविष्यात सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसणार आहे. चालू वर्षी गव्हाच्या क्षेत्रातही घट होणार आहे. निरा नदीवरील सर्वच बंधार्यांतून सध्या पाणी गळती होत आहे. होणारी पाणीगळती थांबवावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.