खेड: सुनावणीदरम्यान पुढची तारीख दिली, मात्र पक्षकार किंवा वकिलांना त्याची माहिती न मिळाल्याने त्यांना तिष्ठत उभे राहावे लागले. यावरून जाब विचारताना नायब तहसीलदार आणि पक्षकार व त्यांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
जोरदार खडाजंगी झाल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. दोन्ही बाजूने खेड पोलिसात तक्रार देण्यापर्यंत प्रकरण गेले. मात्र, तक्रार न होता हे प्रकरण मिटवून घेण्यात आले. खेड तहसील कार्यालयात मंगळवारी (दि. 28) घडलेल्या या घटनेची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे.
खेड तहसील कार्यालयात घडलेल्या या प्रकारावरून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, अधिकार्यांना नियमानुसार काम करू दिले जात नाही. चाकण एमआयडीसीमध्ये कामे मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधी समर्थकांकरवी दहशत निर्माण करीत आहेत.
सर्व शासकीय अधिकार्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे काम करावे, असा आग्रह धरला जात आहे. तसे न झाल्यास त्या अधिकार्यांना धमकावले जात आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांना मागील महिन्यात असेच धमकावले गेले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. मंगळवारी (दि 28) सकाळी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांना धमकावण्यात आले.
ते शासकीय वाहनाने पोलिसांत तक्रार द्यायला गेले. पोलिसांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून बाहेरच्या बाहेर माफी मागायला लावून तडजोड केली. असेच होत राहिले तर अधिकारी दबावाखाली येऊन चुकीचे काम करतील, चुकीचे निर्णय घेतील. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर घडत असलेल्या प्रकाराबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती देणार आहोत. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. अधिकार्यांनी निर्भयपणे काम करावे, त्यांच्या पाठीशी महायुतीचे सरकार आहे, असे मोहिते पाटील यांनी सांगितले.
घडलेल्या घटनेत अनवधानाने बोलणे झाले, त्यात दिलगिरी व्यक्त झाल्याने तक्रार केली नाही असे नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी सांगितले. घटनेच्या वेळी कार्यालयात असलेले महसुलचे नायब तहसीलदार राम बीजे हे देखील या वेळी उपस्थित होते.
सुनावणीची तारीख होती. मात्र, तहसीलदार ज्योती देवरे रजेवर असल्याने पुढची तारीख देण्यात आली. समोरच्या लोकांना त्याची माहिती मिळाली नसावी, त्यावरून जोरजोरात वादविवाद झाला. न्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विरोधातले लोक असे करून अधिकार्यांवर दबाव टाकण्याचा तसेच त्यांच्या बाजूने निकाल लागावा, यासाठीचा प्रयत्न करीत आहेत.- आप्पासाहेब वरकड, शेतकरी, पानमळा
मी ज्येष्ठ वकील आहे. सुनावणीच्या तारखेची पूर्वसूचना नव्हती. आम्ही घाईघाईने तहसील कार्यालयात गेलो. माझे पक्षकार आणि मला तिष्ठत ठेवले. अधिकारी गप्पा मारत बसले होते. विचारणा केली असता पोलिसांना बोलावण्यात आले, हा माझा अवमान आहे. प्रकरण मिटते घेतले नाही तर मलाही योग्य ती न्याय्य कारवाई करावी लागेल.- अॅड. विलास काळे, ज्येष्ठ वकील