वेल्हे: मित्रांसोबत जेवणाची पार्टी सुरू असताना झालेल्या किरकोळ वादातून गावठी पिस्तुलातून गोळी झाडून विशाल संजय चव्हाण (वय 24, रा. कोल्हेवाडी, किरकटवाडी) याची हत्या करणाऱ्या चौघा आरोपींना हवेली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निरंजन धावडे व दाद्या कडू हे दोघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
सतीश देशमुख, श्रीराज दिघे, ऋषिकेश चितारे व गणेश चतुर (सर्व रा. कोल्हेवाडी, किरकटवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे 20 ते 25 वयोगटातील आहेत.
किरकटवाडी येथील कोल्हेवाडी भागात गणेश चतुर याच्या घरी जेवणाची पार्टी सुरू असताना विशाल चव्हाण व त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून संगनमत करून निरंजन धावडे याने गावठी पिस्तुलातून विशाल चव्हाण यांच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारात विशालचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी विशालचा मृतदेह पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे (ता. हवेली) येथील निर्जन भागातील ओढ्यात टाकून दिला.
दरम्यान, मृतदेह आढळून आल्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे पथक बुधवारी (दि. 14) दुपारी घटनास्थळी दाखल झाले. मृताची सुरुवातीला ओळख पटली नाही. मात्र मृताच्या हातावरील गोंदणामुळे त्याची ओळख पटली. त्यानंतर अवघ्या 2 तासांत हवेली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या पथकाने खुनाचा प्रकार उघडकीस आणला. पुढील काही तासांतच चौघा आरोपींना अटक करण्यात आली.
खुनाची घटना नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अटक केलेल्या आरोपींसह गुन्हा गुरुवारी (दि. 15) नांदेड सिटी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. फरार दोघा आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास नांदेड सिटी पोलिस करत आहेत.संतोष तोडकर, सहायक पोलिस फौजदार, हवेली पोलिस ठाणे