पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकर महाराज वसाहत, संभाजीनगर चाळ, चव्हाणनगर, झांबरे हेरिटेज इमारत येथे सहा ते सात जणांच्या टोळक्याने रविवारी सायंकाळी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चार चारचाकी, एक रिक्षा व एका दुचाकीचा समावेश आहे. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित तिघा तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी प्रकाश शिरसाट यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी आणि सहकारनगर हद्दीत वाहन तोडफोडीची घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेत दोन्ही पोलिस स्टेशनमधील 14 पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांची प्रथम उचलबांगडी व नंतर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ही तोडफोडीचे सत्र काही थांबले नाही हे चव्हाणनगर आणि शांतीनगरमधील वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी तलवार आणि लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये दोन्ही ठिकाणी मिळून सहा ते सात गाड्या फोडण्यात आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घनास्थळी धाव घेत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. सर्व तरुण 17 ते 18 वयोगटातील आहेत. दरम्यान, प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्य किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तोडफोड केली असल्याचे दिसून येत असल्याचे सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.