नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररीत्या गाडीमध्ये गोमांस भरून वाहतूक करणाऱ्या दोघांना नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपयांच्या किमतीचे ६५० किलोचे गोमांस व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची टोयोटा कंपनीची कार असा ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला, ही माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
गाडीचालक शहबाज मुक्तार कुरेशी (वय २७) आणि कादिर मुस्तफा कुरेशी (वय ३४, दोन्ही रा. पणसुबा पेठ, जुन्नर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून, याबाबतची फिर्याद कृष्णा प्रताप माने (वय २६, रा, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी दिली.
शुक्रवारी (दि. २०) पहाटे ५.४५ वाजता नारायणगावचे हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावरील मुक्ताई ढाब्याजवळ इंडियन पेट्रोल पंपाशेजारी असलेले पंक्चर दुकानासमोर टोयाटो कंपनीची कार (एमएच ०३ बीसी ०६३९) ही गोमांस वाहतूक करताना दिसून आली. गोमांस वाहतूक करण्यास बंदी असताना व त्या संदर्भात कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या या वाहनात गोमांस नेण्यात येत होते. पोलिसांनी हे वाहन व त्यातील माल ताब्यात घेऊन वरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार आर. एल. काठे करीत आहेत.