जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : भाजीपाला विक्रेत्यांनी थेट जुन्नर नारायणगाव रस्त्यावरील पदपथावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी या विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे. जुन्नर नगरपरिषदेने 2004 -05 मध्ये 13 लाख 82 हजार, तर 2016-17 मध्ये 70 लाख 78 हजार रुपयांचा खर्च करून महात्मा जोतिबा फुले मंडई बांधली. या मंडईमधील गाळे लिलावाद्वारे भाजी विक्रेत्यांना दिले आहेत. परंतु, विविध कारणांस्तव बरेचसे भाजीविक्रेते नेमून दिलेल्या जागी न बसता धान्यबाजार तसेच जुन्नर नारायणगाव रस्त्याच्या बाजूला बैलबाजार येथे व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीने या जागेला तार कंपाउंड केल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी फुटपाथवरच दुकाने थाटली.
या परिसरात विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक थेट रस्त्यावरच आपली वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि गर्दीच्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांची दुकाने आहेत. नगरपालिका व पोलिस प्रशासनाने यापूर्वीही अतिक्रमण होऊ नये म्हणून संबंधितांना विश्वासात सूचना दिल्या होत्या. तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही.
संबंधित बातम्या :