पुणे; पुढारी वृत्तसेवा: वडगाव धायरी येथील एका भाजी विक्री दुकानात भाजी खरेदीसाठी आलेले एक ज्येष्ठ नागरिक आपली 70 हजार रुपये आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी विसरून गेले. मात्र, त्यातील कागदपत्रे तपासून पोलिसांद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून ती पिशवी साभार परत केली. दादासाहेब लाटे असे या प्रामाणिक भाजी विक्रेत्याचे नाव असून, त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
फनटाईम सिनेमागृहाच्या पाठीमागे लाटे यांचे श्री साई भाजी भांडार हे भाजी विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी एक ज्येष्ठ नागरिक भाजी खरेदीसाठी आले. त्यांनी आपल्याजवळील पिशवी एका बाजूला ठेवून भाजी खरेदी केली. भाजीचे पैसे देऊन ते आपल्या घरी गेले. मात्र, थोड्या वेळानंतर ती पिशवी लाटे यांच्या नजरेला पडली. त्यांनी सिंहगड रोड पोलिसांशी तत्काळ संपर्क साधला आणि संबंधित घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिशवी पाहिली. त्यामध्ये 70 हजार रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित ग्राहकाला संपर्क करून ही पिशवी परत केली. या वेळी पोलिसांनी दादासाहेब लाटे यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत सन्मान केला. या वेळी बोलताना लाटे म्हणाले, आमच्या दुकानामध्ये सायंकाळच्या वेळी नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. गर्दीमध्ये अनेक वेळा आमचेही लक्ष जात नाही. परंतु, ही पिशवी पाहिल्यानंतर पोलिसांमार्फत त्यांना दिली आहे. साईबाबांचा आशीर्वाद असल्यानेच अशा प्रकारचे विचार आणि काम करण्याची प्रेरणा सतत मिळत राहते.