Vegetables Pudhari
पुणे

Pune Vegetable Prices: भोगी-संक्रांतीमुळे गुलटेकडी मार्केट यार्डात भाजीपाल्याची मोठी आवक

हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, कोबी 10 ते 20 टक्क्यांनी महाग; लसणाचे दर घसरले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भोगी, संक्रांतीमुळे जास्त भाव मिळेल, म्हणून शेतकऱ्यांनी राखून ठेवलेला माल आणल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 11) फळभाज्यांची मोठी आवक झाली. एरवी, रविवारी सरासरी 100 ट्रकमधून होणारी आवक तब्बल 125 ट्रकवर पोहोचली. राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून ही आवक झाली. आवक वाढूनही मागणी जास्त असल्यामुळे हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर आणि कोबीच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लसणाच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्वच फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथून 15 ते 16 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो. राजस्थान येथून 18 ते 20 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक, गुजराथ येथून भुईमूग 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून मटार 35 टेम्पो आणि राजस्थान येथून 2 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून तोतापुरी कैरीची 2 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 7 ते 8 टेम्पो, तर इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 30 ते 35 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 400 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेटस, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 10ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून 150 टेम्पो आवक झाल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

भोगीमुळे हरभरा गड्डीची आवक 50 हजार जुडींवर

भोगीमुळे हरभरा गड्डीची आवक मोठी झाली आहे. त्यास मागणीही चांगली आहे. त्यामुळे भावात गड्डीमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे. याबरोबरच आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे कोथिंबिरीच्या भावात गड्डीमागे 7 रुपयांनी वाढ झाली आहे. याबरोबरच चुकाच्या भावात गड्डीमागे 2 रुपयांनी वाढ झाली आहे. तर आवकच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे कांदापातच्या भावात गड्डीमागे 5 रुपये, शेपू, चाकवत आणि पुदीनाच्या भावात प्रत्येकी 2 रुपयंनी घट झाली.

उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. कोथिंबिर आणि हरभरा गड्डीस घाऊक बाजारात 10 ते 15 रुपये भाव मिळत आहे. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 11) 1 लाख जुडी कोथिंबिरीची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मागील आठवड्यात 80 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज 70 हजार जुडी आवक झाली. तर हरभरा गड्डीची आवक वाढली आहे. मागील आठवड्यात 30 ते 35 हजार जुडी आवक झालेल्या हरभरा गड्डीची आज 50 हजार जुडी आवक झाल्याचे पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT