पिंपरी : शहरातील मोशी, पिंपरी, चिंचवडगाव व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये मंगळवारी असलेल्या चंपाषष्ठी सणानिमित्त भरताची वांगी आणि कांदापातीला चांगलीच मागणी असल्याचे दिसून आले. कांदापातीची आवक कमी असल्यामुळे याच्या दरात दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारात इतर भाज्यांचे दर स्थिर होते. बटाट्याची आवक 935 क्विंटल एवढी झाली होती. गेल्या आठवड्यातील 771 क्विंटल आवकपेक्षा या आठवड्यात 164 क्विंटल आवक वाढली. घाऊक बाजारात 13 ते 15 रूपये किलो दराने बटाट्याची विक्री झाली. कांद्याची आवक 321 क्विंटल झाली असून, मागील आठवड्यातील 424 क्विंटल झालेली आवक 93 क्विंटलने घटली आहे. घाऊक बाजारात कांद्याची 8 ते 10 रूपये दराने विक्री झाली असल्याची माहिती विक्रेते अतुल पडवळ यांनी दिली. टोमॅटोची आवक 414 क्विंटल एवढी झाली असून, घाऊक बाजारात 7 ते 8 रूपये किलो दराने याची विक्री झाली. भेंडीची आवक 61 क्विंटल ऐवढी झाली असून, घाऊक बाजारात 30 रूपये प्रति किलो दराने विक्री झाली. सोबतच काकडीची आवकही 126 क्विंटल एवढी झाली असून, घाऊक बाजारात 11 रूपये प्रति किलोने विक्री झाली आहे.
पालेभाज्यांच्या एकुण गड्डी 41 हजार 900 तर फळे 377 क्विंटल आणि फळभाज्यांची आवक 3599 क्विंटल एवढी आवक झाली होती.
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी श्री खंडोबाला कांदापात आणि वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखविला जातो. बाजारात भरताची वांगी उपलब्ध होती. मात्र बर्याच विक्रेत्याजवळची कांदापात दुपारी बारा वाजेपर्यंत वक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.