पुणे

पुणे: महामार्ग- वरकुटे बुद्रुकला जोडणार्‍या रस्त्याची दयनीय अवस्था

अमृता चौगुले

वरकुटे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा: वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथील राष्ट्रीय महामार्ग ते वरकुटे बुद्रुकला जोडणार्‍या रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे प्रवाशांनादेखील कळत नाही. बर्‍याच ठिकाणी रस्ता खचला असून काही ठिकाणी तर खड्ड्यातून मार्ग शोधावा लागत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना नाकी नऊ येत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

उजनी धरणकाठच्या गावांना राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा दळणवळणासाठी महत्त्वाचा असणारा हा रस्ता आहे. स्थानिक लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असणार्‍या वरकुटे परिसरातून तालुक्यासह बाहेरील चार कारखान्यांना उसाची वाहतूक मुख्यत्वे याच रस्त्याने होते. खड्ड्यांमुळे रोजच छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

मागील दीड वर्षापासून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे होते. ठेकेदाराला स्थानिकांनी वारंवार तोंडी विनंती करूनदेखील ठेकेदाराने त्याच्याकडे काणाडोळा केला. कधी पावसाचे तर कधी कारखाना सुरू असल्याचे कारण देत ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करण्यात टाळाटाळ केली. स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे दुरुस्तीची मागणी केली असता अधिकार्‍यांनी या सर्व प्रकरणाकडे अर्थपूर्ण काणाडोळा केल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ठेकेदार नेतोय वेळ मारून

रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने रस्ता सहा महिन्यांतच उखडला. परंतु ठेकेदाराकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे देत रस्ता दुरुस्तीची वेळ मारून नेण्यात आली. ठेकेदाराकडे असणारा रस्ता देखभाल दुरुस्तीचा अवधीदेखील संपत आला आहे. भविष्यात सरकारकडून त्या रस्ता दुरुस्तीची नवीन निविदा निघेल आणि रस्ता दुरुस्तीही होईल. परंतु रस्ता मागील दीड वर्षापासून नादुरुस्त असूनही ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. हेच काम वेळेवर झाले असते तर सरकारच्या तिजोरीवर रस्ता दुरुस्तीचा अतिरिक्त ताण आला नसता.

SCROLL FOR NEXT