पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या नदीपात्रातील सहा हजार झाडांच्या कत्तलीचा विषय तापत आहे. अनेक सामाजिक संस्था मचिपको आंदोलनफ करणार आहेत. अशातच अंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेत असून, वृक्षांसाठी सर्व वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन दिले जात आहे. हा विषय फक्त सहा हजार झाडांपुरता मर्यादित नाही. नदीपात्रात काँक्रीटीकरण केल्यास झाडांवर आणि नदीवर अवलंबून असलेली परिसंस्था धोक्यात येईल. एका झाडाभोवती किमान 50 जीव अवलंबून असतात. त्यामुळे सहा हजार झाडे तोडली, तर किमान तीन लाख जिवांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
ही वृक्षांची कत्तल थांबविण्यासाठी चिपको आंदोलनात सहभागी होणार असून, वारकर्यांचीही भेट घेत आहे. 'पंढरपूर विठ्ठल रखुमाई संस्थान'चे सदस्य शिवाजी महाराज मोरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे चंद्रकांत महाराज वांजळे, तुकाराम महाराज देहू संस्थानचे सदस्य माणिक महाराज मोरे, ज्ञानेश्वर माउलीचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार, जोग वारकरी शिक्षण संस्थेचे तुकाराम महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संपर्कप्रमुख विनोद महाळुंगकर, वारकरी दर्पणचे सचिन महाराज पवार यांच्या यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.