वाल्हे: पालखी महामार्गावरून वाल्हे गावात प्रवेश करताच रस्त्यालगतच्या ओढ्यातील कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गेली काही दिवसांपासून वाल्हेतील दोन्ही रस्त्यांलगत असलेल्या ओढ्यात मोठ्याप्रमाणावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ओढ्यातील पाणी दूषित झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून यासंदर्भात ठोस उपायोजना झालेली नाही. त्यामुळे सध्या ओढ्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून गावात येणाऱ्या दोन्ही मार्गावरील प्रवेशद्वारानजिक असलेल्या दोन्ही पुलाशेजारील ओढ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा असूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून साफसफाई होत नसल्याने रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. कचऱ्यामुळे उंदीर, घुशी यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
पालखी महामार्गावरून ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. परंतु, या भागातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. कचऱ्यांमुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. ग्रामपंचायतीने या दोन्ही पुलानजिक नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी,अशी मागणी होत आहे.
वाल्हे ग्रामपंचायतीने रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई करीत ५०० रुपये दंडात्मक कारवाईचा फलक लावला आहे. मात्र, अद्याप दंडात्मक कारवाई होत नसल्याने नागरिक बिनधास्तपणे कचरा टाकत आहेत. आठवडे बाजारातील काही विक्रेते घरी जाताना अंधारात ओढ्यालगत कचरा टाकत असल्याची चर्चा आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायतीच्यावतीने घंटागाडीतून कचरा संकलित केला जातो. मात्र, बहुतांश नागरिक, हॉटेल व्यावसायिक घंटागाडीत कचरा न टाकता रात्रीच्या वेळेस ओढ्याच्या पात्रात किंवा रस्त्याच्या बाजूला कचरा टाकतात. आठवडे बाजारातील काही व्यापारी मोठ्याप्रमाणावर येथील ओढ्यालगत कचरा टाकत आहेत. कर्मचाऱ्यांमार्फत या ठिकाणी स्वच्छता केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.अतुल गायकवाड, सरपंच, वाल्हे