पुणे

पुणे : प्रजासत्ताक दिनापर्यंत लसीकरण पूर्ण करणार

अमृता चौगुले

पुणे : राज्यात गोवरचे आतापर्यंत 139 उद्रेक झाल्याची नोंद आहे. यामध्ये 1087 रुग्णांमध्ये गोवरचे निदान झाले असून, 17 हजार 347 संशयित रुग्ण आहेत. गोवरमुळे राज्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनापर्यंत राज्यातील गोवर-रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.

आरोग्य विभागाच्या व्याख्येनुसार, जेव्हा एखाद्या विशिष्ट भागात गोवरचे पाच संशयित आणि दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची नोंद होते तेव्हा गोवरचा उद्रेक मानला जातो. उद्रेक रोखण्यासाठी लसीकरण चुकवलेल्या सर्व मुलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राज्याकडून सुरू केली जाते आणि 9 महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना अतिरिक्त तिसरा डोसदेखील देते.

6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांमध्ये 10 टक्कयांपेक्षा जास्त पुष्टी झालेल्या प्रकरणांमध्ये प्रादुर्भाव असलेल्या भागात, राज्यदेखील सहा महिन्यांपासून पहिला डोस देण्यास सुरुवात करते. परिसरातील कुपोषित मुलांचाही विशेष आढावा घेतला जातो आणि या मुलांना विशेष आहार, व्हिटॅमिन-ए डोस आणि एमआर लस दिली जाते.

15 डिसेंबर ते 25 डिसेंबरदरम्यान प्रादुर्भाव असलेल्या भागात राज्य एका डोससाठी विशेष मोहीम आणि त्यानंतर दुसर्‍या डोससाठी दुसरी मोहीम 15 जानेवारी ते 25 जानेवारीदरम्यान आयोजित केली जाईल.

प्रोटोकॉलनुसार उपचार
प्रलंबित अहवालांमुळे रुग्णांची संख्या आता अधिकृतपणे नोंदवलेल्या संख्येपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तापासह पुरळ असलेल्या मुलांचे सर्व नमुने सरकारी प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. प्रत्येक संशयित रुग्णाला पॉझिटिव्ह मानून प्रोटोकॉलनुसार उपचार देण्यावर भर दिला जात आहे.

संशयित रुग्णांचा अहवाल येण्याची वाट न पाहता उपचार तातडीने सुरू केले जातात. विशेषत: व्हिटॅमिन 'अ'च्या डोससह इतर
औषधोपचार केले जातात. राज्यभर विशेष लसीकरण मोहिमा आखण्यात आल्या आहेत. गोवरच्या नमुन्यांच्या चाचणीसाठी राज्यात अधिकाधिक प्रयोगशाळा वाढवण्याचा विचार सुरू आहे.
                     – डॉ. प्रदीप आवटे, आरोग्य सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT