पुणे

लम्पीविरोधात सोमेश्वर भागात लसीकरण

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा: बारामतीच्या पश्चिम भागात लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पश्चिम भागात लम्पी स्किनचा फारसा प्रादुर्भाव वाढला नसला, तरीही लसीकरण केले जात असल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय लम्पी स्किनची लक्षणे आढळलेल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. वाणेवाडीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक पवार, डॉ. चेतन यादव, डॉ. विजय भंडलकर, कर्मवीर बाळासाहेब चव्हाण, फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे चालक जगदेव दगडे यांच्या पथकाने सोमवारी (दि. 19) मुरुम आणि वाणेवाडी येथे जनावरांना लसीकरण केले.

वाणेवाडी, मुरुम आणि वाघळवाडी या तीन गावांत सुमारे 2 हजार 500 जनावरे आहेत. 2 हजार लसींचे डोस उपलब्ध झाले असून, सर्व जनावरांना लस दिली जाणार आहे. आतापर्यंत 500 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉ. दीपक पवार यांनी दिली. पशुपालकांनी लम्पी स्किन या आजाराबाबत न घाबरता जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन बारामती पशुवैद्यकीय विभागाने केले आहे. योग्य आणि वेळेत उपचार केल्यास जनावरांची या आजारातून सुटका होत असल्याने पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. राज्य सरकारकडून बारामती तालुक्याला मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाली आहे. बारामती तालुक्यात मोठे पशुधन असून, अनेक शेतकर्‍यांचा गायी, बैल, म्हशी आणि शेळी-मेंढीपालन व्यवसाय आहे. लाखो लिटर दुधाच्या व्यवसायातून अनेकांनी आपली प्रगती साधली आहे. ज्या जनावरांना लम्पी स्किनची लक्षणे आढळून आली आहेत, त्या ठिकाणी वेगाने लसीकरण करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT