पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात एक महिन्यापासून मुंबईसह इतर भागांमध्ये गोवर या विषाणूजन्य आजाराचाही उद्रेक दिसून येत आहे. लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये गोवरच्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. राज्यात वर्षभरात गोवरमुळे 24 बालकांचा मृत्यू झाला. यापैकी केवळ एका बालकाने गोवर-रुबेलाची लस घेतली होती.
गोवरमुळे मृत्यू झालेल्या बालकांमध्ये 0 ते 11 महिने वयोगटातील 7, 12 ते 24 महिने वयोगटातील 5, 25 ते 60 महिने वयोगटातील 5 आणि 5 वर्षे वयापेक्षा अधिक वयोगटातील 2 बालकांचा समावेश आहे. यापैकी 12 मुली आणि 12 मुले आहेत. 15 बालके मुंबई, 4 भिवंडी, 3 ठाणे आणि 2 वसई-विरार येथील आहेत.
गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियानाचा पहिला टप्पा 15 ये 25 डिसेंबरदरम्यान पार पडला. याअंतर्गत 62 हजार 940 बालकांना लशीचा पहिला डोस, तर 61 हजार 527 बालकांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात 25 डिसेंबरपर्यंत 14 हजार 920 अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान 1 लाख 62 हजार 253 बालकांना मव्हिटॅमिन एफची मात्रा देण्यात आली.