टाकळी भीमा: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, डेटा ऑपरेटर यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्राला 17 गावे जोडली असून, या अंतर्गत 6 उपकेंद्र येतात. यामुळे मोठी लोकसंख्या असल्याने नागरिकांना वेळेत आणि चांगले उपचार मिळावेत यासाठी शासनाने सर्व सोयी-सुविधा असलेली चांगल्या दर्जाची इमारत उभी केली आहे. ग्रामीण रुग्णालयापेक्षाही मोठी जागा आणि इमारत या प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासस्थानावरही कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, कर्मचारीसंख्या कमी असल्याने रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. रात्री-अपरात्री उपचारासाठी रुग्णांना ऐनवेळी दुसरीकडे जावे लागते. बाळंतपणासाठी आलेल्या महिला रुग्णांना येथून शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात स्थलांतरित केले जाते. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
वैद्यकीय अधिकार्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष
या केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य सहायक 1, आरोग्यसेविका 3, आरोग्यसेवक 4, डेटा ऑपरेटर 1 ही रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांनी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अनेक दिवस झाले तरी याकडे लक्ष दिले जात नाही. या आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी असल्याने अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागते. लसीकरणही वेळेत होत नाही. यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.