भगवान श्री शंकराची जागृत देवस्थाने Pudhari
पुणे

पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले उत्रेश्वर मंदिर

Pune : श्री शंकराची जागृत देवस्थाने म्हणून परिसरात ओळखली जातात

पुढारी वृत्तसेवा

अर्जुन खोपडे

कौरवांसोबत द्युतामध्ये पराभूत झाल्यावर 12 वर्षांच्या वनवासानंतर 1 वर्ष अज्ञातवास पांडवांना पूर्ण करायचा होता. अज्ञातवास म्हणजे कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी राहणे. जर त्यांची ओळख पटली तर तो अज्ञातवास भंग पावेल म्हणून या काळात पांडव आपले मूळ स्वरूप सोडून वेशांतर करून विराट राजाच्या नगरीत वास्तव्यास राहिले. याच काळात सध्याच्या उत्रौली (ता. भोर) गाव परिसरात पहाटे पूजेसाठी अर्जुनाने बाण मारून तळे तयार केले. या तळ्यातील पाणी घेत वाळूचे शिवलिंग तयार करून अर्जुनाने त्याची पूजा केली. याच ठिकाणी उत्रेश्वर, बनेश्वर असे भगवान श्री शंकराचे दोन अवतार प्रगट झाले, अशी आख्यायिका आहे. तर पुढे दोन्ही ठिकाणी मंदिरे उभारली गेली. त्यापैकी एक श्री उत्रेश्वर देवाच्या अवतारापासून उत्रौली गावची निर्मिती झाल्याचे बोलले जाते, असे जुने जाणकार सांगतात.

भोरपासून 3 किलोमीटर अंतरावर असणार्‍या निसर्गरम्य वातावरणात तळ्यालगत पांडवकालीन उत्रेश्वर, बनेश्वर ही महादेवांची मंदिरे आहेत. भगवान श्री शंकराची जागृत देवस्थाने म्हणून परिसरात ती ओळखली जातात. त्यापैकी उत्रेश्वर हे पांडवकालीन मंदिर पूर्वाभिमुख असून, त्यात गर्भगृह आणि मंडपाचा समावेश आहे. मंदिराची बांधणी कोरीव, महिरप रेखीव, घडीव दगडापासून केलेली असून, त्याच्या दरवाजाची चौकट दगडी आहे.

कळसामध्ये पहिलवानांना व्यायाम, कुस्तीच्या सरावाकरिता तालमीची उभारणी करण्यात आली आहे. उत्रौली गावातील तरुण सकाळी, सायंकाळी या तालमीत व्यायाम करीत असतात. तसेच मंदिरासमोर दगडी नंदी आहे. सभोवतालचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मंदिरालगतच्या तळ्यात वर्षभर पाणी टिकते. त्यातून गावातील काही भागांना पाणीपुरवठा केला जातो.

तसेच, बनेश्वर हेसुद्धा पांडवकालीन पूर्वाभिमुख मंदिर असून, मंदिराच्या प्रवेशद्वारावर काळ्या पाषाणातील नंदी आहे. शेजारी दोन पाण्याची तळी आहेत. हा परिसर देखील निसर्गरम्य आहे. उत्रौली येथील श्री भैरवनाथ ग्रामदैवता ट्रस्ट, ग्रामस्थ, परिसरातील शिवभक्तांच्या मदतीने मंदिर परिसराचे सुशोभीकरण तसेच जीर्णोद्धार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT