पुणे

रासायनिक खते गरजेनुसार वापरा ; कृषी संचालक विकास पाटील यांचे आवाहन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. परंतु, रासायनिक खतांची उचल शेतकर्‍यांकडून अद्यापही सुरू झाली नाही. पाऊस पडताच पेरणीसाठी लगबग सुरू होईल आणि दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे मोठ्या प्रमाणात निविष्ठा विक्री केंद्रांवर खते खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आवश्यक त्या खतांची अगोदरच गरजेप्रमाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी केले आहे.

युरिया खत पाण्यात लगेच विरघळते आणि पहिल्या पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीसोबत खते वापरताना नत्र, स्फुरद, पालाश एकाच खतामधून मिळणार्‍या संयुक्त खतांचा वापर करावा व त्यांची खरेदी करावी. युरिया खताचा वापर दुसरा हप्ता देण्यासाठी करावा.

गावच्या मातीची सुपिकता जाणून घ्या
चालू वर्षाच्या खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण वर्गांमधून शेतकर्‍यांना रासायनिक खतांसोबत जैविक खते, कंपोस्ट, हिरवळीचे खते इत्यादी गोष्टी वापरून रासायनिक खतांचा समतोल वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. मागील चार वर्षांपासून राज्यातील प्रत्येक गावातील मातीचे नमुने तपासून त्यांचे अहवाल शेतकर्‍यांना प्राप्त झाले आहेत. आपल्या गावच्या मातीचा सुपिकता निर्देशांक कृषी सेवा केंद्रावर, ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. या सगळ्या माहितीचा उपयोग करणे आवश्यक आहे.

कृषिक अ‍ॅपमधील माहितीनुसार खते वापरा
कृषी विभाग आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राने मिळून संयुक्तरीत्या प्रसारित केलेल्या कृषिक अ‍ॅपचा वापर शेतकर्‍यांनी करावा. त्यामध्ये आपल्या तालुक्यामधील जमीन प्रकारानुसार व पिकानुसार खते वापराची माहिती दिली आहे. त्याप्रमाणे खताचा वापर केल्यास रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते. रासायनिक खतांची झालेली बचत शेतकर्‍यांच्या पिकांवरील खर्चातही बचत करते, असेही पाटील यांनी कळविले.

SCROLL FOR NEXT