पुणे

पुणे : ‘घाबरू नका; मास्क वापरा’ डॉक्टरांचा सल्ला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या सुट्यांचा हंगाम, पर्यटनाचे बेत, शाळांचे सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव, धार्मिक कार्यक्रम आदींमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढले आहे. चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असला, तरी सध्यातरी भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे 'घाबरू नका, मात्र मास्क वापरा,' असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्याला सर्वांनाच मास्कच्या वापराची सवय लागली आहे. ही सवय कायम ठेवल्यास इतर संसर्गजन्य आजारांपासूनही संरक्षण मिळते. सध्या आपल्याकडे कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, स्वयंशिस्त म्हणून आणि स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी मास्क वापरणे हितावह असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, 'हवेतील गारठा वाढला आहे. सध्या फ्लूचा हंगाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले नाहीत तरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढू शकतात. आपल्याला आजाराची झळ बसू द्यायची नसेल, तर विशेषत: लहान मुले, वृध्द व्यक्ती, सहव्याधी असलेले रुग्ण यांनी मास्कचा वापर प्राधान्याने करायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी तसेच मास्कमुळे इतर संसर्गजन्य आजारांपासूनही संरक्षण मिळते.'

चीनमध्ये ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढला आहे. चीनमध्ये विमानतळावर शनिवारपासून कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी भारतात अनेक नागरिकांची चीनमधून ये-जा झाली आहे. कोरोना वाढणार की नाही, यापेक्षा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने लसीकरण अणि मास्कचा वापर आवश्यक आहे. आतापासून प्रतिबंधक उपाय केल्यास आरोग्य सेवेवरचा ताण कमी करता येऊ शकतो.

                                                                        – डॉ. अमित द्रविड,

विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ
आपल्याकडे सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे शक्य नाही. मात्र, कोरोनातून धडा घेऊन स्वच्छता आणि आरोग्याचे रक्षण याबाबतची सवय लावून घ्यायला हवी. मास्क वापरल्याने तोटा काहीच नाही, झाल्यास फायदाच आहे. त्यामुळे शासनाने केवळ आवाहन केले असले, तरी नागरिकांनी आपणहून मास्क वापरायला पुन्हा सुरुवात करायला हरकत नाही.

                                                                 -डॉ. अच्युत जोशी,
                                                                जनरल फिजिशियन

SCROLL FOR NEXT