पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दोन गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हद्दीलगतच्या 11 गावांचा ऑक्टोंबर 2017 मध्ये महापालिकेत समावेश झाला. यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांचा समावेश आहे. मात्र, महापालिकेच्या मिळकतकराला समाविष्ट गावांचा विरोध आहे. ग्रामपंचायतीच्या तुलनेत वाढीव दराने कर आकारणी होत असून त्या तुलनेत गावांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड या गावांची होती. त्यामुळे ही गावे महापालिकेतून वगळावी अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकिला शिवतारे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, उपायुक्त अजित देशमुख उपस्थित होते.
या बैठकीत सहभागी झालेल्या प्रामुख्याने उरुळी देवाची व फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी महापालिकेतून गावे वगळून दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी केली. त्यावर महापालिकेने गावांना आकारण्यात येत असलेल्या मिळकतकराबाबत बदल करण्याची भुमिका घेतली. मात्र, या बैठकित राजकीय पदाधिकार्यांनी महापालिकेत रहायचेच नाही, अशी भुमिका घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गावांना मिळकतकर परवडत नसेल तर त्यांना महापालिकेतून वगळण्याचे आदेश दिले.
तसेच या गावांसाठी एकत्रितरित्या नगरपालिका स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार यासंबधीचे आदेश येत्या 15 दिवसांत काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकिला रंजीत रासकर, संदिप हरपाळे, अमित हरपाळे, धनंजय कामठे, कपिल भाडळे. सी.ए. कामठे हे ग्रामस्थ उपस्थित होते.
उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांना महापालिकेतून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या गावांमध्ये पालिकेने गेल्या पाच वर्षांत 225 कोटींची विकासकामे केली आहेत. आता या गावांमधील महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले विकास कामांचे प्रकल्प तातडीने थांबविण्यात येतील.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.